पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महत्वकांक्षी काँक्रिटीकरण प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असताना गेले काही दिवस वसई तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अथवा पाणीच असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यात भर पडायला वरई फाट्या लगत असणाऱ्या सातिवली येथील उड्डाणपुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने महामार्गावर १५ ते २० किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा लागत आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात येण्यास किमान १५ -२० दिवसांचा अवधी लागणार असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
सातिवली येथे उड्डाणपूल उभारणीचे काम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे अपेक्षित होते. मात्र संबंधित ठेकेदाराकडून आवश्यक गतीने काम पूर्ण न झाले नाही. उड्डाणपुलाच्या मध्यावर असणाऱ्या काँक्रिटीकरणाचा भाग व सुरत बाजूला उतरण्या च्या भागात भराव टाकण्याचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या मुंबईकडील पोहोच रस्त्या वरील भरावाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. यंदा मे महिन्या च्या अखेरच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने मुरूम भरावाचे काम स्थगित करावे लागले. त्याचबरोबरने दोन्ही बाजूच्या पोहच रस्त्यांवर डांबरीकरण करण्याचे काम प्रलंबित राहिल्याने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक पुला लगतच्या सेवा रस्त्यावरून करण्यात येत आहे.
मान्सून हंगामाला सुरुवात होताच या सेवा रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून अवजड वाहनांना प्रवास करणे कठीण व धोकादायक झाले असून लहान वाहनांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सुमारे ४००- ४५० मीटर लांबीचा पट्टा ओलांडण्यासाठी वाहनांना मोठ्या प्रमाणात अवधी लागत आहे. परिणामी महामार्गावर दुतर्फा १५ किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या रांगा लागत असून हा पट्टा ओलांडण्यासाठी दिन ते चार तासांचा अवधी लागत असल्याची माहिती तारापूर येथे दैनंदिन प्रवास करणाऱ्या उद्योजकांनी दिली आहे.
वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक वाहन चालक विरुद्ध दिशेने प्रवास करण्याचा प्रयत्न करीत असल्याने काही ठिकाणी किरकोळ अपघात होऊन वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत. यावर देखरेख करण्यासाठी महामार्ग पोलीस अकार्यक्षम ठरत असल्याने पालघरची पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सातिवली पट्ट्यात पालघर वाहतूक पोलिसां चे पथक तैनात केले आहे. तरीदेखील वाहन कोंडीचा प्रश्न कायम राहिल्याने मार्गावरील वाहन चालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर सलग होणाऱ्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस व इतर सर्व संबंधित विभागाची तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सेवा रस्त्यावरील खड्डे बुजवणे, अपूर्ण असणाऱ्या उड्डाणपुलावरून हलक्या वाहनांना प्रवास करू देण्याची मुभा देण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. त्याच बरोबरीने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन यांची नेमणूक करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
याच पट्ट्यात निवास करणारे बोईसर चे आमदार विलास तरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून उद्भवलल्या समस्येबाबत चिंता व्यक्त केली. गेल्या दोन वर्षापासून सातिवली येथील उड्डाण पुलाच लगत असणाऱ्या सेवा रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नसल्याने हा प्रश्न पावसाच्या सुरुवातीला उद्धवला असल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले. संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी तसेच मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
२५ किलोमीटरसाठी साडेतीन तास
राष्ट्रीय महामार्गावर लांब लचक वाहनांच रांगा लागल्या असून काही अवजड वाहन चालकाने चुकीच्या पद्धतीने मार्गिका ओलांडल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. डहाणू तालुक्यातील महामार्गावरील तवा गावातून सकाळी १० वाजता निघालेल्या महेश चंपानेरकर यांना सातिवली पूल ओलांडण्यासाठी तब्बल साडेतीन तास लागल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.
नियोजनाचा अभाव
५५४ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाचे आखणी व नियोजन सुरुवातीपासून फसल्याचे दिसून आले होते. सातिवली पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसून येत असताना त्यावेळी पर्यायी रस्त्यांचे मजबुतीकरण व रुंदीकरण करणे आवश्यक होते. मात्र नियोजनाचा अभाव तसेच खर्चात बचत करण्याची प्रवृत्तीमुळे हे काम झाले नसल्याने या मार्गावरील वाहन चालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे
किमान १५ दिवसांचा अवधी लागणार
सातीवली पुलाच्या लगत असणाऱ्या सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या प्रत्येक बाजूला दोन मार्गीका असणाऱ्या सेवा रस्त्यांचे काँक्रीटी करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या काँक्रिटीकरणामध्ये शीघ्र मजबुतीकरण होणाऱ्या घटकांचे (रॅपिड हार्डनिंग) वापर करण्यात येणार असून काँक्रिटीकरण झाल्यानंतर काही दिवसातच त्यावरून वाहतूक सुरू करण्याची मुभा देण्यात येणार आहे. मात्र सुमारे ८०० मीटर लांबीच्या दोन मार्गीकांचे विशेष घटकांच्या समावेशाद्वारे करण्यासाठी किमान १५ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
विरुद्ध दिशेच्या मार्गीके वरून वाहतूक
मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर तुफान वाहतूक कोंडी होत असताना मुंबईकडे जाणाऱ्या मार्गी का वाहनांनी व्यापल्याने दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. वसई पासून थेट चिल्हार (बोईसर नाका) च्या पुढंपर्यंत वाहतूक कोंडी ची व्याप्ती असून हा पट्टा ओलांडण्यासाठी दोन ते चार तासांचा अवधी लागत आहे. वरई मार्गे पालघर जाण्याच्या मार्गावर खामलोली येथील एकेरी पुलावर असणारी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने त्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी झाली आहे. रात्रीच्या वेळी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यरत नसल्याने झालेली वाहतूक कोंडी सायंकाळपर्यंत कायम राहिल्याचे स्थानिक वाहन चालकांकडून सांगण्यात आले.
सातीवली पुलाच्या लगत सेवा रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम तातडीने हाती घेण्यात येणार असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान विरुद्ध दिशेच्या मार्गीके वरून प्रवास करू पाहणाऱ्यांना रोखण्याच्या दृष्टीने महामार्ग तसेच स्थानिक पोलिसांची मदत घेतली जात आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे उर्वरित ठिकाणी होणाऱ्या कोंडी प्रश्न सोडवण्यासाठी उपाय योजना आखल्या जात आहेत. –सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण