बोईसर : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत आदिवासी महिलांकडून दोन कोटींपेक्षा अधिकची रक्कम जमा करून त्याचा परतावा न देता आर्थिक फसवणूक करणारे पती-पत्नीसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास पालघर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी रुपेश पाटील याला पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे तर इतर पाच आरोपी अजूनही फरार आहेत.
पालघर तालुक्यातील बहाडोली येथील रुपेश पाटील आणि त्याची पत्नी कल्पना पाटील यांनी मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गात संपादित जमिनीचा मोबदला मिळालेल्या धुकटण परिसरातील गरीब आदिवासी महिलांना गुंतवलेल्या रक्कमेवर वार्षिक १६ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत दोन कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा केली होती. आदिवासी महिलांकडून जमा केलेली रक्कम त्यांनी गुजरात राज्यातील क्रेडीट सोसायटीमध्ये गुंतवली होती.
मुदत पूर्ण झाल्यानंतर देखील गुंतवलेली मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज परत न भेटल्याने महिलांनी रुपेश पाटील आणि कल्पना पाटील या पती पत्नीकडे आपले गुंतवणूक केलेले पैसे मागण्यास सुरवात केली. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर देखील गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने आर्थिक फसवणूक करण्याची लक्षात येतात महिलांनी बहाडोली येथील रुपेश पाटील आणि त्याची पत्नी कल्पना रुपेश पाटील यांच्या विरोधात मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पालघर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.
गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नारळे, पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीता आथने, पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाठ, हवालदार कैलास बोंड यांच्या पथकाने दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी पैकी मुख्य आरोपी रुपेश पाटील याला रविवारी गुजरात राज्यातील वापी येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्याला पालघर येथील न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपी कल्पना रुपेश पाटील हिच्यासह गुजरात राज्यातील चार आरोपी हे फरार असून आर्थिक पुणे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत आहे.