पालघर-त्र्यंबकेश्वर-घोटी राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्राधिकरणाचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : पालघर येथे जिल्हा मुख्यालय झाल्यानंतर पालघरला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाला पालघर-त्र्यंबकेश्वर-घोटी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्या ठिकाणी देखील रस्त्याचे रुंदीकरण झाले असून खराब झालेल्या साईडपट्टीच्या ठिकाणी अजूनही माती भराव झालेला नाही. या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या देखभाल-दुरुस्ती करण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याने हा मार्ग धोकादायक झाला आहे.

पालघर येथे जिल्हा मुख्यालय स्थापन झाल्यानंतर शहराकडे येणाऱ्या वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत देखील या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत तसेच देखभाल-दुरुस्तीचा ठेका मंजूर असताना त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून आले आहे.

या मार्गावर मासवण जवळ सूर्या नदीवर उभारण्यात आलेल्या काटकोनातील वळणामुळे पुलाचा हा भाग धोकादायक झाला असून या ठिकाणी गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात घडले असून अनेक अपघातग्रस्तांनी प्राण गमावले आहेत. पुलावर असणाऱ्या वळणामध्ये बदल करणे लागलीच शक्य नसले तरी या अपघात प्रवण क्षेत्राजवळ सूचना फलक लावणे, रंबलरची उभारणी करणे किंवा पुलाच्या काठडय़ाना संरक्षण रेलिंग बसविणे इत्यादी उपाययोजनांकडे प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाले आहे.

या मार्गावरील साईडपट्टीमधील मातीचा थर पावसाळ्यात धूवून गेला असून रस्त्यालगत अनेक ठिकाणी खोलगट भाग निर्माण झाले आहेत. अशा ठिकाणी वाहने रस्त्यावरुन खाली उतरल्यास त्यांचा तोल जाणे किंवा सावरण्याच्या प्रयत्नात अपघात घडण्याचे प्रकार घडत आहेत. पालघर मुख्यालयाला जोडणाऱ्या या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा दीर्घकालीन ठेका दिला असताना या कामांत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highway travel dangerous road ysh
First published on: 02-12-2021 at 01:34 IST