बोईसर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणाच्या कामामुळे सुरू झालेले वाहतूक कोंडीचे विघ्न कायम आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत असून यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी बाहेर गावी जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मस्तान नाका ते चिल्हार फाटा पर्यंत मागील आठवड्यापासून काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई आणि गुजरात दोन्ही वाहीन्यांनवर एकाच वेळी काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून वाहतूक बाजूच्या सेवा रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. मात्र बेशिस्त वाहन चालकांमुळे रविवारी सकाळपासूनच या टप्प्यात प्रचंड कोंडी होऊन संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. विरुद्ध दिशेने येणार्‍या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडल्याने दोन्ही बाजूला जवळपास पाच ते सहा किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील टेण नाका, मस्तान नाका, जव्हार फाटा, चिल्हार फाटा या उड्डाणपुलाखाली देखील वाहनांची कोंडी झाल्याने त्याचा मनोर वाडा, मनोर पालघर, मनोर जव्हार आणि चिल्हार बोईसर या रस्त्यावरील सुरू असलेल्या वाहतुकीला फटका बसला. महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिस आणि ट्रॅफिक वार्डन यांना मोठी कसरत करावी लागत होती.

हेही वाचा : पालघर : वेळेत उपचाराअभावी बालकापाठोपाठ मातेचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दहीसर ते अच्छाड या १२१ किमीच्या भागात काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. नियोजित मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी वसई, खानीवडे, मनोर, चारोटी या भागात एकाच वेळी काम सुरू करण्यात आल्याने संपूर्ण महामार्गावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, ठेकेदार कंपनी आणि महामार्ग पोलिस यांना काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये याचे व्यवस्थित नियोजन करण्यात अपयश येत असून त्याचा मोठा फटका या महामार्गावरून प्रवास करणारी अवजड मालवाहू, प्रवासी आणि खाजगी वाहने यांना बसत आहे.