पालघर : अत्यावश्यक सेवेतील १०८ रुग्णवाहिका चालकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून राज्यभर काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील २९ रुग्णवाहिका आणि ६० पायलट (रुग्णवाहिका चालक) सहभागी झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. रुग्णवाहिका सेवा ठप्प झाल्यामुळे गंभीर रुग्णांचे व गर्भवती मातांचे हाल होण्याची शक्यता आहे.
राज्यातील १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिका चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने निवेदने दिल्यानंतरही शासन व सेवा पुरवठादार कंपन्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने रुग्णवाहिका चालकांनी आजपासून (१ जुलै) ‘कामबंद’ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) करत असून ३० जूनपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेण्यात आल्यामुळे १०८ सेवा ठप्प झाली आहे.
१०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संघटनेने यापूर्वी १३ मे २०२५ रोजी आझाद मैदानात करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनावेळी आरोग्य सेवा संचालकांनी चर्चा करून योग्य तो न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आजतागायत सेवा पुरवठादारांकडून पाठपुरावा करण्यात आला नाही. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम झाला असून तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणेने चालकांच्या मागण्यांवर त्वरित लक्ष देऊन हा तिढा सोडवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
शासनाने योग्य वेळी दखल न घेतल्यामुळे रुग्णांना वाऱ्यावर सोडून आंदोलन करायची वेळ आली आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून गेले अनेक वर्ष मागण्या प्रलंबित असताना देखील काम सुरू ठेवले. मात्र शासन व सेवा पुरवठादार दोघेही मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने हे आंदोलन छेडण्यात आले आहे. – महेश काजळे, १०८ रुग्णवाहिका चालक, पालघर
रुग्णवाहिका चालकांच्या समस्या
अल्प वेतनावर काम करावे लागते, रुग्णवाहिकांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे, रुग्णवाहिकेला आग लागून रुग्ण व चालकाचा जीव जाण्याच्या घटना घडत आहेत, वाहन चालकाकडून ज्यादा काम करून घेतले जाते परंतु मोबदला दिला जात नाही, आठ तासाचा कामाचा नियम असताना बारा तास काम करून घेतले जाते, समान काम समान वेतन करावे या व अशा अनेक मागण्यांसाठी १०८ रुग्णवाहिका चालकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. आरोग्य मंत्री, प्रशासन व ठेकेदार यांची संलग्न बैठक घेऊन यावर तोडगा काढावा अशी मागणी रुग्णवाहक चालक यांच्याकडून करण्यात आली आहे.