वसई : पालघर लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह केला आहे. येत्या आठवड्याभरात पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर याबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत. लोकसभा निवडणूकीचे वारे सुरू झाले आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्यामुळे या प्रवर्गाचा उमेदवार उभे करणे, हे एक आव्हान असून प्रत्येक पक्ष त्यादृष्टीने कामाला लागला आहे. पालघर लोकसभा जागेवर अजूनही कुठल्याही राजकीय पक्षाकडून उमेदवार घोषित झालेली नाही. महायुतीमध्ये शिंदे गट की भाजपा असा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांची कोंडी झाली आहे. या लोकसभा क्षेत्रात प्रमुख प्रभाव असलेला बहुजन विकास आघाडी काय भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : पालघरमध्ये बनणार अत्याधुनिक मध्यवर्ती कारागृह; ६३० कोटींचा निधी मंजूर

बविआ पक्ष पातळीवर कार्यकर्त्यांकडून बविआचा उमेदवार रिंगणात असावा असा सूर नेतृत्वाकडे लावला जात आहे. कार्यकर्त्यांच्या सभा होत आहेत व त्यातून कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकुर हे याबाबत अजून व्यक्त झालेले नाहीत. काही दिवसांतच ते याबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील असे कळते.