पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी २४ मे रोजी विविध विकास योजनांची प्रत्यक्ष पाहणी करत ग्रामीण भागातील प्रगतीचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा, आणि पायाभूत सुविधांच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त केले.
यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रधान सचिव डवले यांनी आपटाळे गावातील कापरीचापाडा येथे डवले यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामाची पाहणी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या गरजा आणि प्रगती जाणून घेतली. काही घरे १,००० चौरस फुटांपर्यंत आणि आरसीसी बांधकामात उभारली गेल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, रायतळे ग्रामपंचायतीतील घरकुल मार्ट आणि उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी सुरू केलेल्या वीटभट्टी व्यवसायाची पाहणी केली. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले असून, कातकरी समाजातील स्थलांतर थांबल्याने डवले यांनी विशेष समाधान व्यक्त केले.
कापरीचापाडा येथे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरींची पाहणी करताना डवले यांनी नमूद केले की, या योजनेमुळे शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे भाजीपाला आणि फळपिकांची लागवड वाढली असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी कुसुम योजने अंतर्गत सोलर पंपांमुळे शेती उत्पादनात वाढ झाल्याचे सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात ६०० विहिरींची कामे पूर्ण झाल्याची माहिती दिली.
रायतळे ग्रामपंचायतीतील कातकरी वसाहतीत उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या भूमी महिला प्रभाग संघाच्या उपक्रमांचा आढावा घेताना डवले यांनी महिलांच्या प्रगतीचे कौतुक केले. कृषी अवजारे योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या पॉवर टिलरचीही पाहणी करण्यात आली. या उपक्रमांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आहे. जलजीवन मिशन आणि पायाभूत सुविधा जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळयोजनेच्या कामांची पाहणी करताना डवले यांनी अंमलबजावणीच्या गतीबाबत समाधान व्यक्त केले.
साखरशेत येथील नमो ग्राम सचिवालय, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय, आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन त्यांनी स्थानिक सुविधांचा आढावा घेतला. तसेच, जिल्हा परिषद सेस फंडातून बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यांची पाहणी करत त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या या उपाययोजनांचे कौतुक केले.
जव्हार येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत डवले यांनी नरेगा आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाइटवर थेट पाहणी करून लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वेळेवर जमा होत असल्याची त्यांनी पडताळणी करून योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी जाणून घेत अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, अतुल पारसकर, इजाज अहमद शरीक मसलत, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रवीण भावसार, जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते, आणि इतर मान्यवरांचा समावेश होता. प्रगतीचे कौतुक आणि भविष्यातील दिशाप्रधान सचिव एकनाथ डवले यांनी जव्हार तालुक्यातील ग्रामविकास योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त केले. शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण, आणि ग्रामीण आरोग्य सुविधांमधील सुधारणांचे कौतुक करत त्यांनी अधिकाऱ्यांना भविष्यातील विकासकामांसाठी प्रोत्साहन दिले. या दौऱ्याने जव्हार तालुक्यातील ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळाली असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.