पालघर : डहाणू तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुकडआंबा येथील शिरसोनपाडा येथे उभारलेल्या पाण्याच्या उंच साठवण टाकीचा लँडिंग स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्या प्रकरणात संबंधित ठेकेदार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व त्रयस्थ तांत्रिक परीक्षण संस्था यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या नळ पाणी योजनेतील तीनही टाक्यांचे संरचनात्मक लेखापरीक्षण केल्यानंतर त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळल्याने या तिन्ही टाक्या पाडून पुनश्च नवीन टाक्या बांधण्याची शिफारिश करण्यात आली आहे.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुकडआंबा येथे नळपाणी योजनेच्या उभारणीसाठी २.३० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या योजनेच्या कामाला ऑक्टोबर २०२२ रोजी कार्यादेश देण्यात आले होते. या अंतर्गत पाणी साठवणूक करण्याचे टाकीचे काम पूर्ण झाले असता १७ मार्च २०२५ रोजी शिरसोनपाडा येथील साठवण टाकीचा लँडिंग स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून चौकशी करण्यात आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून नोंदणी प्रमाणेच असणाऱ्या मे. हरीश बोरवेल्स या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. या कामावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करणाऱ्या नाबार्ड कन्सल्टन्सी सर्विसेस (पीएमसी) यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला असून या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समिती येथील कार्यरत क्षेत्रीय अभियंता यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच संरचनात्मक लेखापरीक्षणात कामाचा दर्जा अयोग्य असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे श्रेष्ठ तांत्रिक परीक्षण संस्था म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या टीयूडी एसयुडी साउथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडून प्राप्त तांत्रिक परीक्षण अहवालात विसंगती असल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या कार्यालयात पाठवण्यात आली आहे.
टाक्या नव्याने बांधणार
या दुर्घटनेनंतर १२ मीटर उंचीच्या शिरसोनपाडा (३४००० लिटर), पाटील पाडा (४४००० लिटर) व जुनून पाडा (३१००० लिटर) क्षमतेच्या बांधण्यात आलेल्या उंच साठवण टाक्यांचे संरचनात्मक लेखापरीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट वीजेटीआय (मुंबई) महाविद्यालयाकडून करून घेण्यात आले. या अभियांत्रिकी महाविद्यालयाने जुलै २०२५ मध्ये सादर केलेल्या अहवालात या टाक्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून तिन्ही पाण्याच्या टाक्या पाडून पुनश्च दर्जेदार बांधण्याचे कळवले होते. याबाबत संबंधित ठेकेदाराला सुचित करण्यात आले असून टाक्या पाडण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल असे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत
या दुर्घटनेत मृत पावलेल्या दोन विद्यार्थिनींच्या कुटुंबाला प्रत्येकी दीड लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय समितीने या संदर्भातील प्रस्तावाला मार्च २०२५ मध्ये मंजुरी दिली होती. मृत मुलींच्या कुटुंबीयांना ही रक्कम १६ ऑगस्ट रोजी देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे.