ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सांडपाण्याच्या गटारांची कामे

डहाणू : चिंचणी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत रिफाई मोहल्ला येथे सांडपाणी तसेच पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या भेडसावत असल्याने नागरिकांनी लोकवर्गणीतून सांडपाणी वाहून नेण्यासाठी सांडपाणी वाहिनी टाकण्याची वेळ नागरिकांवर आल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पाइपलाइनसाठी प्रत्येकी २ हजारांची लोकवर्गणी काढल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत ग्रामविकास अधिकारी रवींद्र थोरात यांना विचारले असता त्यांनी ही खाजगी जागा असून ते काम त्यांनीच करायचे असून यामागे ग्रामपंचायतीची बदनामी करण्याचा प्रकार आल्याचे लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू तालुक्यात एकूण ८५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २० हजार लोकसंख्या असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीला सर्वाधिक उत्पन्न आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील ग्रामस्थांना सोयीसुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. येथे गेल्या दीड वर्षांपासून करोना महामारीमुळे ग्रामसभा होत नसल्याने मनमानी सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चिंचणी गावात सुमारे पाच हजार मालमत्ताधारक असून अनेक प्रभागांत शेवटच्या टोकावर असलेल्या घरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रिफाई मोहल्ला येथे नागरी वस्ती असून शौचालय तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. शिवाय गटाराची साफसफाई केली जात नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहते.  सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामस्थांना पाडय़ावरील लोकवर्गणीने गटाराची लाइन टाकण्याची वेळ आली आहे.

गावातील विकासकामे, घनकचरा, दिवाबत्ती, अतिक्रमणे, दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी आवश्यक बाबींकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.  नागरी सुविधांकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

 –  दुभास अंभिरे, रहिवासी, चिंचणी

तक्रार केलेली वसाहत ही खाजगी मालमत्ता असून ती सुविधा मालकाने करायची आहे. त्याबाबत त्यांना सूचनाही केल्या आहेत. अशा प्रकारातून ग्रामपंचायतीची बदनामी केली जात आहे.

 – रवींद्र थोरात, ग्रामविकास अधिकारी, चिंचणी

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of civic amenities in chinchani ssh
First published on: 17-06-2021 at 02:01 IST