पालघर : समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी नवली येथील फाटक बंद करून उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचून धोकादायक स्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर तातडीने तोडगा काढण्यास अपयशी ठरल्यास नवली रेल्वेफाटक उड्डाणपूल संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. यानंतर उपजिल्हाधिकारी यांनी स्थळ पाहणी करून भुयारी मार्ग पादचारी व दुचाकी स्वारांसाठी प्रवास करण्यास सुरक्षित राहील यासंदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

नवली रेल्वे फाटकापासून पश्चिमेकडील भागात ५०० मीटरच्या अंतरात शाळा, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, शासकीय आरोग्य केंद्र व दैनंदिन बाजारहाट असल्याने, अंदाजे १० हजार लोकवस्तीच्या पूर्व भागातील नवली, वेवूर, डाॅ.आंबेडकरनगर, भीमाईनगर, कमारे, वरखुंटी, भोगोलेपाडा अशा अनेक गावपाड्यातील शेकडो ग्रामस्थ, विद्यार्थी, नोकरदार यांना दैनंदिन कामासाठी पूर्व-पश्चिम रहदारी नवली रेल्वे फाटक मधून होत असे. या रेल्वेफाटकावर उड्डाण पुलाचे काम मे २०२० पर्यंत पूर्ण होणे नियोजित होते परंतु पाच वर्षांचा कालावधी झाल्यानंतरही पुलाचे काम अपूर्णावस्थेत राहिले आहे.

रेल्वे प्रशासनाने १० एप्रिल २०२५ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच पर्यायी मार्ग तयार झाला नसताना नवली रेल्वे फाटक बंद कले. रेल्वे प्रशासनाने फाटकाच्या दक्षिणेकडील भागातील रेल्वेरूळाखालून एका नैसर्गिक नाल्यालाच पर्यायी मार्ग बनवून अव्यवहार्य व गैरसोयीचा पर्यायी मार्ग पूर्वेकडील ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिला. त्याचवेळेस पूर्वेकडील ग्रामस्थांनी रेल्वेफाटक बंद करण्यास विरोध दर्शविला असताना रेल्वे प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनास व पूर्वेकडील ग्रामस्थांना या फाटकावरील उड्डाण पुलाचे काम १५ जून २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल असे लिखित आश्वासन दिले होते. परंतु रेल्वे प्रशासनानी दिलेली कालमर्यादा संपल्यानंतरही कामाची प्रगती पाहता अजून काही महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागणार असे दिसून येत आहे.

उपलब्ध करून दिलेला पर्यायी रस्ता बनवताना रस्त्याची योग्य उंची न राखल्याने व पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था न केल्याने पहिल्याच पावसात पर्यायी मार्गावर तीन फुटापेक्षा जास्त पाण्याची पातळी वाढून या पर्यायी मार्गाला वाहत्या नाल्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे गावपाड्यातील ग्रामस्थांचा प्रवास जोखमीचा झाला असून हजारो ग्रामस्थ जीव धोक्यात घालून धोकादायक प्रवास करीत आहेत.

या मार्गात पाण्याच्या प्रवाहाचा जोर पाहता व पालघर जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे पर्यायी मार्गातून पायी वा दुचाकीवरून प्रवास करताना अपघात होऊन जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. ही बाब ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्हा व रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. या संपूर्ण प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अनास्था दाखवल्यामुळे ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दल जिल्हा व रेल्वे प्रशासनाबद्दल नाराजी उफाळून आली आहे.

प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने नवली रेल्वेफाटक उड्डाण पूल संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने १ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांची प्रत्यक्ष भेट घेवून नवली रेल्वेफाटक सुरु करण्याची किंवा रेल्वे रूळाखालून केलेला पर्यायी मार्ग प्रवास करण्यायोग्य होईल अशा रितीने दुरूस्त करावा अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाकडून मागण्यांची पूर्तता न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनामधून देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी पालघर यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपजिल्हाधिकारी महेश सागर, उपकार्यकारी अधिकारी (सार्वजनिक बांधकाम विभाग) पोपट चव्हाण यांनी डी.एफ.सी.सी.च्या अधिकाऱ्यांसोबत तात्काळ प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी मेजर हनुमंत यादव, माजी नगरसेवक राजेश गायकवाड व संजय गायकवाड, कुणबी समाज संघ अध्यक्ष मनोज घरत, माजी लोकपाल छबिलदास गायकवाड व इतर सहकारी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या नवली फाटक येथील उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करण्याच्या बाबतीत स्थानिक लोकांनी पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना निवेदन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी तात्काळ नवली फाटकाच्या ओव्हर ब्रिजच्या कामाला भेट दिली व तेथील स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. या ठिकाणी डी.एफ.सी.सी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरीष्ठ अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदार व स्थानिक नागरीक मोठया प्रमाणत उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ओव्हर ब्रिजचे काम लवकर होण्याच्या दृष्टीकोनातून व नागरीकांना जाण्यायेण्याच्या अडचणींचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीकोनातून उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी संबंधित कंत्राटदारांना सूचना दिल्या व वेळेत काम करण्याचे नियोजन तात्काळ करावे असे सूचित केले. तसेच सद्यस्थित बंद असलेल्या रेल्वे फाटक क्र. ४६ मुळे दक्षिणेकडील अंडरपासचा वापर करण्यात येत आहे. त्या अंडरपास मध्ये मोठया प्रमाणावर पाणी तूंबते त्याची पाहणी करुन त्याठीकाणी उंची वाढवणे शक्य आहे किंवा कसे याची सुध्दा तपासणी उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी केली. त्या ठिकाणी रॉम्प करता येईल का याची तपासणी डी.एफ.सी.सी  करुन सदर रॉम्पचे काम करावे अशी सुचना त्यांना केली.