संरक्षक कठडे तुटले, पुलाचा स्लॅब खचला

कासा : जव्हार तालुक्यातील मांजवीरा गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. पुलाचा स्लॅब दबलेला आहे. दगड निखळले आहेत. अनेक ठिकाणी पुलाचे बांधकाम ढासळले आहे. तसेच पूल धोकादायक असल्याचा सूचनाफलकही दिसेनासा आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा मार्ग दिवसा व त्यापेक्षा रात्री जास्त धोकादायक ठरत आहे. दिवसाबत्तीची सोय नसल्याने अनेकदा बाहेरून येणारे वाहन भरकटण्याच्या घटना घडत आहेत. पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी गावातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांनी प्रशासनाकडे केली आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे सामान्य जनता जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करत आहे.

शृंगारपाडा ते मांजवीरा यांना जोडणारा हा मार्ग असून या मार्गावरील असलेल्या या पुलाला संरक्षक कठडे नाहीत. तसेच, या ठिकाणी सध्या पुलावर कडेला धोकादायक सूचना फलकसुद्धा लावलेला नाही. या पुलाचे दगड काही ठिकाणी निखळले असल्याने भरधाव वाहनांसाठी ते अधिक धोक्याचे ठरत आहे. मात्र असे असतानादेखील प्रशासन मात्र कोणतीही देखभाल दुरुस्ती करताना दिसून येत नाही. पुलाच्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळे पूल असल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची भीती नागरिक व्यक्त करत आहे.

शृंगारपाडा ते मांजवीरा यांना जोडणाऱ्या पुलाच्या दुरुस्तीबाबत आढावा घेतला जाईल. आम्ही याबाबत योग्य ती कार्यवाही करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू.

– डी. डी. पाटील, सार्वजनिक बांधकाम अधिकारी, जव्हार

हा पूल धोकादायक असून या पुलावरून आम्हाला प्रवास करावा लागत आहे. मोठी वाहने या पुलावरून जात नाहीत. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीची अनेकदा मागणी केलेली आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर हा पूल दुरुस्त करावा.

– अजय भसरा, ग्रामस्थ

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manjvira pool dangerous jawhar ssh
First published on: 18-09-2021 at 02:45 IST