पालघर : पालघर तालुक्यातील धुकटण येथे राहणाऱ्या प्रीती जाधव (२२) या महिलेच्या प्रसुती नंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे तसेच तातडीने आवश्यक उपचार उपलब्ध होऊ न शकल्याने या महिलेचा सोमवारी सकाळी सेलवास येथील रुग्णालयात निधन झाले. पालघर जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच मनोर येथे उभारण्यात येणाऱ्या ट्रॉमा केअर सेंटर चे काम गेल्या अनेक वर्षांपासून निधी अभावी रखडल्याने गंभीर रुग्णांना इतरत्र हलवण्याच्या प्रक्रियेदरम्यान प्रकृती खालावल्याने हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मासवण जवळील धुकटण येथे राहणारी ही महिला पहिल्या खेपेच्या प्रसुतीसाठी रविवार (ता ५) रोजी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. तिची तपासणी कामावर असणाऱ्या कर्मचारी व डॉक्टरने करताना सोनोग्राफी दरम्यान बाळाच्या गळ्याभोवती नाळ असल्याचे दिसून आले. या महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया करून प्रसुती करण्याच्या दृष्टीने मनोरच्या ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या खाजगी स्त्रीरोग तज्ञांशी सल्लामसलत करण्यात आले. तसेच ते अन्य प्रसूत शस्त्रक्रियेत व्यस्त असल्याने या महिलेला त्यांच्या रुग्णालयात पाठवून दाखवून देण्यात आले होते. मात्र तातडीने कोणतीही उपायोजना करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांचे मत झाल्याने तसेच ते व भूल तज्ञ मनोरमध्ये उपलब्ध असल्याने या गर्भवती महिलेला मनोर गमीण रुग्णालयात पुन्हा दाखल करून घेण्यात आले.

रविवारी सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास या महिलेची सामान्य प्रसूती झाली असता या मातेच्या वर (प्लासेंटा) सोबत गर्भपिशवीचा भाग प्रसुती दरम्यान बाहेर आल्याचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. अशा दुर्मिळ घटनेमुळे महिलेचा रक्तस्त्राव सुरू राहिल्याने या महिलेला प्रथम पालघर तालुक्यातील उपलब्ध असणाऱ्या स्त्रीरोग तज्ञांशी संलग्न खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र अशा रुग्णाला हाताळणी करण्यासाठीची आवश्यक यंत्रणा व सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक डॉक्टरांनी या रुग्णांना मोठ्या रुग्णालयात पाठवण्यासंदर्भात अभिप्राय दिला.

या महिलेला वलसाड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्याची तयारी करण्यात आली व सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास रुग्णवाहिकेतून या महिलेला पुढील उपचारासाठी पाठवण्यास आले असता चारोटी जवळ तिची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास आले. या महिलेला नंतर सेलवास येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून तिला चार बाटल्या रक्त देण्यात आले तसेच अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र या महिलेच्या काल (७ ऑक्टोबर) रोजी सकाळी निधन झाले. मृत मातेची शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात आला असून सुमारे अडीच किलो वजनाच्या मुलीची प्रकृती ठीक असल्याचे मनोर ग्रामीण रुग्णालया च्या सूत्रांकडून सांगण्यात आले. पालघर जिल्ह्यात गंभीर होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था नसल्याने अशा रुग्णांना अनेकदा गुजरात, सेलवास, ठाणे , मुंबई येथे पाठवणे भाग पडत असल्याने त्यादरम्यान अशा रुग्णांची प्रकृती खालावून मृत्यू होण्याचे प्रकार घडत आहेत.

दरम्यान प्रसूतीनंतर गुंतागुंत झल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून या महिलेला गुजरात येथे पाठवण्या चां निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मनोर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून सांगण्यात आले. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला नसल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. माता मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची आमदार विलास तरे यांची मागणी.

मनोर ग्रामीण रुग्णालयातील प्रिती जाधव हिचा प्रसुतीनंतर झालेल्या गुंतागुंती मुळे मृत्यू झाल्याबाबत तात्काळ चौकशी व जबाबदार डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई अशी मागणी बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देत जोरदार मागणी केली आहे.

प्रीती जाधव हिला प्रसूती दरम्यान स्थिती गंभीर झाल्याने मनोर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाला इतरत्र हलवणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. मात्र १०८ रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली नाही असे नातेवाईकां कडून आरोप केले जात आहेत. गुजरात येथील रूग्णालयाकडे रुग्णवाहिकेत जात असताना रस्त्यात ऑक्सिजन संपला. ऑक्सिजन सिलेंडर संपल्याने रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यातून परत आली आणि नवा सिलेंडर घेऊन पुन्हा मार्गस्थ झाली याकडे मृदाच्या नातेवाईकांनी लक्ष वेधले आहे. रुग्णाचा अतिशय रक्तस्त्राव होऊन रस्त्यातच मृत्यू झाला आणि प्रशासन व डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे घडले असेही आरोप करण्यात आले आहेत.

त्याअनुषंगाने प्रिती जाधव यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची अधिकृत उच्चस्तरीय चौकशी आदेशित करण्यात यावी. रुग्णालयाशी सलग्न १०८ रुग्णवाहिका सेवा व ऑक्सिजन पुरवठा प्रणालीची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी तसेच या प्रकरणात सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी व्यक्तिगत हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश द्यावेत असे आमदार विलास तरे यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात आमदार विलास तरे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली असता मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी देखील मंत्री महोदयांकडे केली आहे.