पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचे २३ ऑगस्टला आंदोलन

वाडा : पोषण अभियानअंतर्गत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने २०१९ मध्ये अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाइल फोन परत करण्याचे आंदोलन पुकारले आहे. पालघर जिल्ह्यात सोमवारी (२३ ऑगस्ट) रोजी जिल्ह्यातील ३१८३ अंगणवाडी सेविका आपापल्या तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात शासनाने दिलेले मोबाइल परत करणार असल्याची माहिती पालघर जिल्हा अंगणवाडी सेविका संघटनेच्या प्रतिनिधी अरुणा पाटील यांनी दिली.

पालघर हा आदिवासी बहुल लोकवस्ती असलेला जिल्हा असून दुर्गम व डोंगराळ भागात व्यापलेला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत मोबाइल नेटवर्क नसल्याने मोबाइल फोनवरून दररोज माहिती पाठवणे शक्य होत नाही. तसेच अनेक अंगणवाडी सेविकांचे शिक्षण कमी असल्याने त्यांना अजून मोबाइलवरील वेगवेगळ्या ‘अ‍ॅप’ची हाताळणी करणे शक्य होत नाही.

पालघर जिल्ह्यात ३१८३ अंगणवाडी सेविकांना तत्कालीन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पोषण अभियानअंतर्गत २०१९ मध्ये मोबाइल फोन दिलेले आहेत. या मोबाइलच्या माध्यमातून स्तनदा माता, गरोदर महिला व बालकांचे वजन, उंची, अशी सर्व माहिती भरून ती शासनाला द्यायची असते. मात्र शासनाने दिलेल्या मोबाइलची रॅम कमी पडते, नवनवीन अ‍ॅप डाऊनलोड होत नाहीत, अ‍ॅप इंग्रजीत असल्याने कमी शिक्षण असलेल्या सेविकांना त्याची हाताळणी करता येत नाही. तसेच, पालघर हा जिल्हा बहुतांशी डोंगराळ, दुर्गम भागात असल्याने येथील अनेक भागांत कुठल्याच कंपनीच्या सिमला नेटवर्क उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे मोबाइल असून नसल्यासारखेच झाले आहेत.

त्यातच मोबाइल फोन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाइल ‘हँग’ (तांत्रिक दोष) होत आहेत. अशा अनेक तक्रारी अंगणवाडी सेविकांकडून सांगण्यात आल्या. रोजच्या मोबाइल फोनच्या तक्रारींना वैतागलेल्या अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी सेविका संघटनेचे राज्य अध्यक्ष ब्रिजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ‘मोबाइल वापसी’ हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वत:च्या मोबाइल फोनचा उपयोग

शासनाने दिलेले मोबाइल फोन बंद पडल्याने पालघर जिल्ह्यातील ७३६ अंगणवाडी सेविका स्वत:च्या खर्चाने स्वत:चा मोबाइल फोनचा वापर करीत आहेत. नादुरुस्त झालेले मोबाइल फोन दुरुस्तीचा खर्च शासन द्यायला तयार नाही. स्वत:च्या मोबाइल फोनचा रिचार्ज खर्च उचलायला शासन तयार नसल्याचे अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेचे राज्य प्रतिनिधी राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

शासनाचे बंद पडलेले मोबाइल फोन स्थानिक पातळीवर दुरुस्त होत नसल्याने स्वत:चे मोबाइल वापरण्याची वेळ आली आहे.

– प्रगती पाटील, अंगणवाडी सेविका, वाडा