पालघर : संकटाच्या क्षणी मदतीला धावणारी आणि अनेक रुग्णांसाठी ‘जीवनवाहिनी’ ठरलेली १०८ रुग्णवाहिका सेवा पालघर जिल्ह्यात गेल्या ११ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहे. या सेवेने आतापर्यंत तब्बल दोन लाख ६८ हजार ६१९ रुग्णांना आजारादरम्यान सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवले आहे. यात सर्वाधीक रुग्णांमध्ये जवळपास ५० हजार गर्भवती महिलांचा समावेश आहे.
१ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या या सेवेचा ताबा सुरुवातीला ठाणे जिल्ह्याकडे होता. मात्र १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर १०८ रुग्णवाहिका सेवा पालघर जिल्ह्याकडे हस्तांतरित करण्यात आल्या. सध्या पालघर जिल्ह्यात २९ रुग्णवाहिका कार्यरत असून त्या चालवण्यासाठी ६० प्रशिक्षित चालक कार्यरत आहेत. यापैकी सर्वाधिक वसई-विरारमध्ये सहा, पालघर तालुक्यात पाच रुग्णवाहिका आणि उर्वरित इतर तालुक्यांमध्ये प्रत्येकी तीन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.
एखादा अपघात झाल्यानंतर अवघ्या १० मिनिट ते अर्ध्या तासाच्या आत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचणे शक्य होते. रस्त्यांची दुर्दशा, वाहतूक कोंडी आणि खड्डे यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना नाशिक, वलसाड किंवा मुंबई येथे हलवताना अनेकदा उशीर होतो. तर काही वेळा यामुळे रुग्ण दगावण्याची भीती सुद्धा असते. रुग्णवाहिका चालकासमोर हे प्रमुख आव्हान असल्याने रुग्णवाहिकेत डॉक्टरांची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि जिल्ह्याला अतिरिक्त ७२ रुग्णवाहिका मिळवण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी आरोग्य सेवा आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे.
रुग्णवाहिकेतून प्रवास करणारे १२ प्रकार
१०८ रुग्णवाहिका सेवेने अपघात, मारामारी, भाजणे, हृदयविकार, पडणे, विषबाधा, विजेचा धक्का लागणे, वैद्यकीय (इतर सर्वसाधारण आजार), अनेक ठिकाणी गंभीर दुखापत (पॉलीट्रॉमा), आत्महत्या किंवा त्याचा प्रयत्न, प्रसूती आणि इतर अशा एकूण बारा प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तत्काळ मदत पुरवून जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत मोलाची भर घातली आहे.
रुग्णवाहिकेत डॉक्टरांची आवश्यकता
एका रुग्णवाहिककरता दोन डॉक्टर असावीत याकरिता मागणी शासनाकडे करण्यात आली असून याकरिता जिल्हास्तरावर देखील भरती प्रक्रिया सुरू आहे. रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध असल्यास रुग्णांना काळजी घेणे सोपे जात असल्याने शासनाकडे याकरिता मागणी केली आहे.
माता आणि बालकांना नवसंजीवनी
१०८ रुग्णवाहिकेने प्रसुती दरम्यान जिल्ह्यातील ४९२४८ माता आणि बालकांची सुरक्षित वाहतूक करून त्यांना नवसंजीवनी दिली आहे. विशेष म्हणजे १४८६ महिलांची प्रसूती थेट रुग्णवाहिकेतच झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर ३९ व्हेंटिलेटरवरील गंभीर रुग्णांनाही वेळेवर मदत मिळाली आहे.
जिल्ह्यात २९ रुग्णवाहिका असून रुग्णवाहिका सेवा देण्याचे काम आम्ही करत आहोत. काही अडचणींमुळे सेवेत विलंब होत असतो. तरीही दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून रुग्णाचा जीव वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. – अमित वडे, सहा. जिल्हा व्यवस्थापक १०८ रुग्णवाहिका.
१०८ प्रणाली मधील रुग्णवाहिकेचे तालुका निहाय तक्ता
तालुका – रुग्णवाहिका संख्या
- डहाणू – ३
- जव्हार – ३
- मोखाडा – ३
- पालघर – ५
- तलासरी – ३
- वसई – ६
- विक्रमगड – ३
- वाडा – ३
108 रुग्णवाहिकेतून रुग्णांची वाहतूक
- अपघात – 9639
- मारामारी – 1135
- भाजणे – 753
- हृदयविकार – 2095
- पडणे – 4716
- विषबाधा – 5923
- प्रसूती महिला – 49,248
- विजेचा धक्का लागणे – 76
- वैद्यकीय (इतर आजार) – 168404
- इतर – 18777
- गंभीर दुखापत (पॉलीट्रॉमा) – 7681
- आत्महत्या किंवा प्रयत्न – 172
- एकूण – 268,619