वाडा: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येत असलेल्या विक्रमगड तालुक्यातील कावळे या शासकीय आश्रमशाळेत अकरावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी संध्याकाळी बास्ते येथे घडली.
विक्रमगड तालुक्यातील मौजे बास्ते येथील रविना रमेश हांडवा (१७) ही विद्यार्थिनी रोज बास्ते येथील तिच्या राहत्या घरून ये-जा करून कावळे आश्रमशाळेतील कनिष्ठ महाविद्यालयात कला (आर्ट) विभागात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी ती घराशेजारी असलेल्या जंगलात गेली व तिकडेच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्याप्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून येथील पोलीस निरीक्षक प्रदीप गिते पुढील तपास करीत असून आत्महत्येचे निश्चित कारण समजलेले नाही. हा प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.