पालघर : पर्यावरण संतुलन, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आदींसाठी मधमाशीपालन गरजेचे असून मधमाशी संवर्धनाकरिता पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यांमध्ये पोषक वातावरण उपलब्ध असल्याने या भागात मधुक्रांती करिता मोठी संधी उपलब्ध आहे. मधमाशी उत्पादनाच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढवणे शक्य होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतीसोबत मधमाशी संवर्धन करणे देखील आवश्यक झाले आहे.

२० मे हा जागतिक मधमाशी दिन जगभरात साजरा केला जातो. देशात हरितक्रांती, श्वेतक्रांती झाली तशी जिल्ह्यात मधुक्रांती घडवण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा मानस आहे. त्या दृष्टीने मधमाशीपालनाच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढवणे आणि रोजगार निर्मिती करणे याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रात विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

पालघर जिल्ह्यात डहाणू, तलासरी भागात मधमाशी पालन क्षेत्र अधिक आहे. या भागात बागायती क्षेत्र अधिक असल्याने तसेच पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने भाजीपाला फळ व फुल उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे वनाखाली क्षेत्र वाढत आहे. या भागात फुलोरा मधपेट्या जास्त असल्याने त्याचा फायदा मधमाशी पालनासाठी होत आहे. शिवाय फळझाडांची लागवड मोठया प्रमाणात होत असून सेंद्रिय शेती क्षेत्र विस्तारत आहे. त्याला अनुकूल मधमाशी पालन असल्याने शेती उत्पादन आणि मध व्यवसाय असा दुहेरी उद्देश त्यातून साध्य होऊ शकेल.

कोसबाड कृषी केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर पाच ते सहा फुलोरा मधपेट्या तयार करण्यात आल्या आहेत. मधमाशांना काळोख, आडोशाचे ठिकाण, बंद पेटी अशा जागा मधाचे पोळे तयार करण्यासाठी लागतात. परंतु फुलोरा या जंगलात उघड्यावर झाडांच्या फांदीला किंवा या ठिकाणी असतात. त्यांच्यासाठी तशी पेटी कठीण होते. त्यामुळे सुरुवातीला एका टोपलीत मधमाशा लटकवून ठेवण्यात आल्या. मात्र टोपली स्थलांतर करणे अवघड असल्याने पेटीची संकल्पना समोर आली. तीन बाजूने उघडी व उजेड येईल, अशी पेटी तयार करून त्यात फुलोरा मधपोळे ठेवण्यात आले. हा प्रयोग काही अंशी यशस्वी ठरल्यानंतर इतर पेट्या विकसित करण्यात आल्या. या पेट्यांमध्ये माशा एक ते दीड महिना स्थिर राहत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. मधमाशी पालनामुळे विविध पिकांचे 20 ते 30 टक्के उत्पादन वाढू शकते. त्याचबरोबर एका मध पेटीतून वर्षातून 6 ते 8 किलो मध मिळत असले तरी या माशांचा खरा उपयोग शेतकऱ्यांना आहे. यामूळे मधमाशी पालनातून अर्थार्जन मिळू शकते असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

फुलोरी मधपेटी वरदान

परागीकरणासाठी बागायतीमध्ये उपयुक्त असलेल्या फुलोरा वा मधमाशीच्या पालनपेटीची निर्मिती पालघर जिल्ह्यातील कोसबाड कृषी केंद्राने गेल्या दोन वर्षात केली आहे. केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने केंद्रातच कमी खर्चात प्रायोगिक तत्वावर ही मधमाशी पालनपेटी तयार केली आहे. देशभरात हा पहिलाच प्रयोग असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

कृषी विज्ञान केंद्रात कार्यशाळा

कृषी विज्ञान केंद्रात शेतीला पूरक मधमाशीपालन, शुद्ध नैसर्गिक मधाचे उत्पादन, मधमाशांद्वारे परागीभवन घडवून अन्नधान्य, फळबाग उत्पादनात लक्षणीय वाढ कशी करावी?, सातेरी, मेलीफेरा, ट्रायगोना आणि फुलोरी मधमाशी जवळून पाहण्याचा, हाताळण्याचा दोन्ही दिवस अनुभव, मधमाशी वसाहतीचे विभाजन करून नवीन वसाहती निर्माण कशा कराव्या, निसर्गात आढळणार्‍या सातेरी मधमाश्या पेटीत भरण्याच्या कलेचे प्रात्यक्षिक, मधमाशांचे शत्रुपासून संरक्षण, अनुभवी मधपालकांची भेट, फार्म व्हिझिट व प्रात्यक्षिक, प्रत्येकाला मधमाशी हाताळण्याची संधी या विषयावर प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जात आहे.

जिल्ह्यात मधमाशी संवर्धनासाठी पूरक वातावरण व आंबे, चिकू, भाजीपाला याची परागीभवनासाठी मदत होते. या परागीभवनाद्वारे शेती, पिके आणि फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ होत असल्यामुळे शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करु शकतात. याकरिता शासनामार्फत एकात्मिक फलउत्पादन विकास अभियाना अंतर्गत इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. कृषी विभागाकडून मधमाशी हाताळणी करिता प्रशिक्षण दिले जात असून यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व शासनाच्या अभियानाचा लाभ घ्यावा.

निलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, पालघर