पालघर: दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटक व ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभर तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पालघर येथे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाकडून व आमदारांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाकडून तिरंगा रॅली काढून राजकीय शक्ती प्रदर्शन करत असल्याचे पाहायला मिळत आहे

पहलगाम हल्लाचे प्रत्युत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाने केलेली कामगिरी, शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठीच आज शिवसेना शिंदे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून हुतात्मा चौक पर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीकरिता बोईसर विधानसभा आमदार विलास तरे, जिल्हा प्रमुख कुंदन संखे, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार अमित घोडा व मनीषा निमकर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

17 मे रोजी भारतीय जनता पक्षाकडून दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये सैनिकांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी हुतात्मा चौक ते जुना पालघर श्री हनुमान मंदिर पर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीच्या शिंदे गट व भाजपमध्ये गेल्या काही महिन्यपासून अंतर्गत वाद सुरू असल्याचे ऐकायला मिळत होते. देशाच्या सैनिकांच्या कौतुकाकरिता काढण्यात आलेली तिरंगा रॅली दोन्ही पक्षांनी एकत्र न काढता वेगवेगळी दोन दिवसाच्या अंतरावर काढल्यामुळे अंतर्गत नाराजी समोर आली आहे. शनिवारी भारतीय जनता पक्षाने पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तर आज शिंदे गटाने आमदारांच्या उपस्थितीत रॅली काढून वैयक्तिक पक्षाचे शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदारांनी पालकमंत्र्यांना घातले पाठीशी

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तेथे पालकमंत्री फिरकले नसल्याबाबत बोईसरचे आमदार विलास तरे यांच्याकडे विचारणा केली असता महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी उभे आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे व मच्छीमारांचे पंचनामे करण्याबाबत शिवसेनेने जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे. तसेच पालकमंत्री यांचा व्यस्त कार्यक्रम असताना देखील त्यांनी याबाबत संपर्क साधून दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शस्त्र संधीमुळे रॅली केली होती स्थगित

दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन पाकिस्तानला माघार घेण्यास भाग पाडले. त्या अनुषंगाने 11 मे रोजी शिवसेना शिंदे गटाकडून तिरंगा रॅली काढण्यात येणार होती. मात्र शस्त्रसंधी झाल्याने तिरंगा रॅली रद्द करण्यात आली होती.