डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर शनिवार १४ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एक कंटेनर उलटून अपघात झाला आहे. कंटेनर मध्ये बंद डब्यांमध्ये रसायनाची वाहतूक करण्यात येत असून हे रसायन गळती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सफेद धूर पसरला आहे. सध्या स्थानिक पोलीस आणि सबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

मुंबई कडून गुजरात कडे निघालेल्या मालवाहू कंटेनर मध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड चे कच्चे रसायन असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मेंढवण येथील उड्डाणपुलाच्या तीव्र वळणावर वाहन उलटून अपघात झाला. वाहन उलटल्यामुळे कंटेनर मधील डब्यांमध्ये असलेले रसायन गळती झाली असून यामुळे धुरांचे लोट उठल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. अपघातानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावरील दोन्ही वाहिनीवरील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली असून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दल आल्यानंतर रसायनावर पाणी मारण्यात आले असून धुराचे लोट कमी झाल्यानंतर दोन्ही वाहिनीवरील प्रत्येकी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून वाहन बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.

वाहना मधील रसायन गळती झाल्याबरोबर धुराचे लोट उठले होते. यामुळे परिसरात धूर पसरून नागरिकांच्या डोळ्यांना जळजळ होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. वाहनमधील रसायनाच्या डब्यांवर हायड्रोजन पेरॉक्साइड असे नाव लिहिलेले असून वाहन चालक घाबरून पळून गेल्यामुळे नक्की कोणते रसायन आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या असून वाहन बाजूला काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण गावच्या हद्दीतील तीव्र वळणावर मोठ्या संख्येने अपघात घडत आहेत. महामार्गाचे नूतनीकरण करताना या वळणावर उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र याकडे महामार्ग प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे मेंढवण हद्दीतील अपघात सुरूच आहेत.