पालघर : जुलै महिना वगळता यंदा नियमित पाऊस झाला असल्याने आनंदित असलेला पालघर जिल्ह्यातील शेतकरीवर्ग हा जिल्ह्यात २७ व २८ तारखेला झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे चिंतेने ग्रासला आहे. शेतामधील कापणीला आलेले भात पीक अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाले असून अजूनही परतीचा पाऊस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे संभावित आहे. भुईसपाट झालेल्या भात पिकाचे सर्वेक्षण कृषी विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत सुरू झाले असून किमान १० टक्के लागवड क्षेत्रावर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात ७९१४८.८२ हेक्टर क्षेत्रफळावर भात पिकाची लागवड झाली असून त्यापैकी २५ ते ३० हजार हेक्टर लागवड मध्ये ९० ते १०० दिवसात तयार होणाऱ्या हळव्या वाणांच्या भात लागवड क्षेत्राचा समावेश आहे. बहुतांश ठिकाणी असे हळवे व निमगरवे वाणाची पीक तयार होऊन कापणीला आले असताना ४० ते ६० किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तसेच किनारपट्टीच्या गावांमध्ये झालेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाली आहे.
रविवारी रात्री उशिरा पासून पावसाने विश्रांती घेतली असली तरीही सोमवार व आज मंगळवार पावसाच्या अधून मधून सरी येत आहेत. त्यामुळे जमीन दोस्त झालेल्या व तयार झालेल्या पिकाचे दाणे गळून पडून ते पुन्हा शेतामध्ये रुजली जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
ज्या ठिकाणी पिक गर्भ अवस्थेत (पोटरी), फुलोरा आला आहे अथवा दाणा भरण्याची स्थिती आहे अशा उंच होणाऱ्या पिकांच्या वाणांमध्ये पिकाच्या
वजनामुळे भात झुकण्याची शक्यता अधिक असल्याने नुकसानीची भीती अधिक आहे. तर हळवे वाढ असणाऱ्या भाताच्या प्रजाती कमी उंचीच्या (बुटक्या) राहत असल्याने त्याला या वादळी वाऱ्याचा कमी फटका बसला असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच ज्या शेतामध्ये झालेल्या पावसाचे पाणी साचले आहे त्यातही भाताचे खोड व मूळ कुजण्याची शक्यता निर्माण झाली असून मुसळधार पावसामुळे अस्मानी संकटाला शेतकरी सामोरे गेले आहेत.
कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत जिल्ह्यातील ७०६ हेक्टर क्षेत्र (एक टक्क्यापेक कमी) बाधित झाल्याचे अंदाज व्यक्त केला असून लागवड क्षेत्राच्या आठ ते १० टक्के नुकसान झाल्याची शक्यता दिसून आली आहे. यात झालेल्या नुकसानीचे कृषी विभाग, महसूल तसेच ग्रामसेवकांना मार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पुढील काही दिवसात नुकसानीचे आकडेवारी समोर येईल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी लोकसत्ता ला सांगितले. दरम्यान झालेल्या सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
भाता पिकाची वर्गवारी
१) हळवे वाण (९०-१०० दिवस)
लागवड क्षेत्र : २५ ते ३० हजार हेक्टर
२) निमगरवे वाण (११५-१२० दिवस)
लागवड क्षेत्र : १५ ते २० हजार हेक्टर
३) गरवे वाण (१२०-१३० दिवस)
लागवड क्षेत्र : ३०-३५ हजार हेक्टर
तालुका- भात लागवड क्षेत्र (हे.)
- पालघर : १५७९८.२३
- वसई : ७१०९.६८
- डहाणू : १६५२१.७५
- तलासरी : ९७७७.२६
- वाडा : १४३६१.७
- विक्रमगड : ७०२५.१४
- जव्हार : ६५३६.५६
- मोखाडा : २०१८.५
- एकूण : ७९१४८.८२