बोईसर : सूर्या प्रकल्पातून सोडण्यात येणारे सिंचनाचे पाणी शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोचवण्याचे लक्ष पालघर पाटबंधारे विभागाने निर्धारित केले आहे. सन २०२५-२६ च्या रब्बी हंगामात उजवा आणि डावा तीर कालव्यांची दुरुस्ती पूर्ण करून सिंचनापासून वंचित गावांना पाण्याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि पालघर तालुक्यातील ७० ते ८० गाव पाड्यांतील शेती रब्बी हंगामात ओलिताखाली आणून आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करीत त्यांचे जीवनमान उंचावले जावे यासाठी १९८० च्या दशकात सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी आणि कवडास उन्नेयी अशी दोन धरणे बांधण्यात आली. यातील मुख्य धामणी धरणातून कवडास बंधाऱ्यात पाणी सोडले जाऊन त्यातून उजवा तीर कालवा २८.१९ किमी लांबी व डावा तीर कालवा ३३ किमी असे कालवे तयार करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पर्यंत पाणी पोहोचवण्यात आले, मात्र कालांताराने देखभाल दुरुस्तीअभावी कालवे आणि लघुपाट वितरीका यांची प्रचंड दुरवस्था झाली.

कालवे ठिकठिकाणी नादुरुस्त झाल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन शेतकऱ्यांपर्यंत अपेक्षित पाणी पुरवठा अडथळा निर्माण होऊन निर्धारित केलेली १४६९६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यास पालघर पाटबंधारे विभागाला अपयश येऊन सिंचन क्षमतेत हळूहळू घट होऊन ती जवळपास ६ हजार हेक्टर इतकी कमी झाली. त्यातच सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई विरार आणि मीरा भाईदर शहरांना देण्याच्या निर्णयाने जिल्ह्यातील पाणी शहरांमध्ये पळविले जात असल्याच्या भावनेतून शेतकऱ्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.

सूर्या प्रकल्पाचे पाणी सर्व शेतकऱ्यांना मिळावे याकरिता उजवा आणि डावां तीर कालव्याचे पाणी शेवटच्या गावांपर्यंत पोचविण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत क्षतीग्रस्त कालव्यांची दुरुस्ती आणि अस्तरीकरणाच्या कामांनासुरवात करण्यात आली. सन २०२४-२५ च्या सिंचन हंगामात डावा आणि उजवा तीर कालाव्यांची दुरुस्ती आणि अस्तरीकरणाची कामे जवळपास ६० टक्के पूर्ण करण्यात आली असून उर्वरीत कामे पावसाळा संपल्यानंतर सन २०२५-२६ च्या हंगामात केली जाणार आहेत.

सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांच्या दुरवस्थेमुळे रब्बी हंगामात उजवा तीर कालव्यावरील महागाव या गावापर्यंत पाणी पोचू शकत होते. मात्र यावर्षी दुरुस्तीची कामे हाती घेतल्यानंतर पुढील वारांगडे, मान, कल्लाळे, पडघे, देवखोप, नंडोरे, वाकसई, शेलवली, वरखुंटी, कमारे या शेवटच्या भागातील गावापर्यंत प्रथमच काही प्रमाणात पाणी पोचवण्यास पाटबंधारे विभागाला यश आले. पुढील हंगामात दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पुरेशा प्रमाणात पाणी पोचण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

पालघर शहराजवळील या गावापर्यंत सूर्या प्रकल्पाचे पाणी पोचल्यानंतर हे पाणी पुढे कमारे परिसरातून उगम पावणाऱ्या पाणेरी ओहळामध्ये सोडण्याचे प्रयोजन आहे. त्यामुळे पालघर आणि माहीम परिसरातील घरगुती आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेल्या पाणेरी ओहळाचे प्रदूषण कमी होण्याचा अंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सन २०२४-२५ च्या सिंचन हंगामापासून सूर्या प्रकल्पाच्या उजवा आणि डावा कालव्यांची दुरुस्ती व अस्तरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील हंगामात शिल्लक असलेली कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. यामुळे पाण्याची गळती आणि नासाडी टळून सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे तसेच शेवटच्या भागापर्यंत पाणी पोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. – योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, पालघर पालघर पाटबंधारे