पालघर: गेल्या तीन-चार दिवसांपासून पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सोमवार सायंकाळपासून पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली आहे.
पालघर जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आल्यामुळे मंगळवारी (१९ ऑगस्ट) शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय टळली. तर गेल्या २४ तासांत (१८ ऑगस्ट सकाळी ८ ते १९ ऑगस्ट सकाळी ८ पर्यंत) जिल्ह्यात सरासरी ८२.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये तलासरी तालुक्यात सर्वाधिक ११८ मिलिमीटर तर डहाणू व पालघर तालुक्यांमध्ये प्रत्येकी १०३ मिलिमीटर पाऊस कोसळला. इतर तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाला असून विक्रमगडमध्ये ९९.५ मिलिमीटर, वसईमध्ये ९३ मिलिमीटर आणि वाड्यात ५९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याउलट जव्हार आणि मोखाडा तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असून फक्त ५ ते ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
रेल्वे वाहतूक कोलमडली
मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचले. यामुळे गुजरात कडून मुंबईकडे जाणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. तर अनेक उपनगरीय सेवा रद्द तर काही उशिराने धावत आहेत. डहाणूवरून मुंबईकडे जाणाऱ्या उपनगरीय गाड्या दुपारी पालघर येथे थांबवून पुन्हा डहाणूच्या दिशेने परत पाठवण्यात आल्या होत्या. तर काही गाड्या डहाणू ते विरार व विरार ते डहाणू अशा पश्चिम मार्गावर संथगतीने वाहतूक सुरू होती.
राज्य व राष्ट्रीय महामार्गांना नाल्याचे स्वरूप
रस्ते वाहतुकीचीही स्थिती गंभीर झाली आहे. अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पालघरमधील मुंबई-बडोदा एक्स्प्रेसवे खालील मासवण येथील ब्रिजखाली पाणी साचल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. तसेच, राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० अ वरील विक्रमगड तालुक्यातील पाचमाड पूल आणि चिंचघर पूल पाण्याखाली गेल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
इतर काही महत्त्वाचे रस्तेही बंद झाले आहेत:
- डहाणू-कासा दरम्यान गंजाड गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद.
- वाडा तालुक्यातील अंबरभुई गावात जाणारा रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद.
- शीळदेहर्जे, दाघडे, भोपोली या मार्गांवरील वाहतूक थांबली.
- वसईतील शहरी भागातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे पाण्याखाली असल्याने बंद.
घरात पाणी शिरल्याने नागरिक हैराण
रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे घरातील सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी नागरिकांची मोठी धांदल उडाली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्ह्यातील पाणी साठलेल्या भागांतून पाणी काढण्यासाठी पंपांचा वापर केला जात आहे. पालघर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांची सुट्टी, शिक्षकांचा प्रवास
पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी, शिक्षकांना मात्र आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांसाठी शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे अनेक शिक्षक सकाळी शाळेत पोहोचले, मात्र परतीच्या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांवर व पुराच्या पाण्यामुळे त्यांना अडकून जावं लागलं.
जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
हवामान विभागाने १९ ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
नदी आणि नाल्यांच्या काठावर राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी ०२५२५-२९७४७४, ८२३७९७८८७३ किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, २० ऑगस्टच्या सुट्टीबाबतचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत कळवला जाईल.
कासा परिसरात जनजीवन विस्कळीत
डहाणू तालुक्यातील कासा परिसरात सखल भागातील अनेक घरांमध्ये २ ते ३ फूट पाणी साचले आहे. कासा-चारोटी रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली असून, गुलजारी नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे डहाणू-चारोटी रस्ता बंद झाला आहे. कवडास-उन्नई बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सूर्या नदीला पूर आला आहे.