बोईसर : पालघर तालुक्याच्या एका गावातील घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न घरमालकाच्या प्रसंगावधानामुळे फसला. रात्रीच्या सुमारास घराचे दार तोडत असताना मालकाने केलेल्या आरडाओरडामुळे दरोडेखोर पळून गेले. याप्रकरणी मनोर पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने सात आरोपींना अटक केली आहे.
पालघर तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेले नानिवली गावात १३ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास प्रसाद विजय पाटील यांच्या घराचा दरवाजा लोखंडी रॉडने तोडत असताना झालेल्या आवाजाने प्रसाद पाटील यांना जाग आली. दरोडेखोर हे तोंडाला रुमाल बांधून चेहरा झाकलेल्या अवस्थेत लोखंडी रॉडने दरवाजा तोडत होते, तसेच त्यांच्या हातात चिकटपट्टी व अग्निशस्त्र होते. याप्रसंगी घाबरून न जाता प्रसाद पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड सुरू केला. यामुळे आपण पकडले जाणार या भीतीने दरोडेखोरांनी सोबत आणलेल्या इको या कारमधून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी प्रसाद पाटील यांनी मनोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची नेमणूक करून दरोडेखोरांना अटक करण्याच्या बाबतीत मार्गदर्शन केले.
पोलिसांच्या विशेष पथकाने नानिवली येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त खबरीच्या माहितीनुसार कासा वळवी पाडा येथून संदीप अशोक वळवी, तुषार गणेश रटाटे, ऋषिकेश भगवान गुरव (कुंज, विक्रमगड), रामदास रमेश सालकर (देहरजे, विक्रमगड), प्रणय गंगाराम गावित (धामणी, विक्रमगड), अमोल अशोक वांगड (वाघाडी, डहाणू), भरत जयवंत मेढा (घाणेघर, विक्रमगड) या सात आरोपींना ताब्यात घेऊन अटक करून गुन्ह्यात वापरलेली इको कार जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून त्यांना पालघर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केली असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील हे अधिक तपास करीत आहेत.