पालघर : पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीने किनाऱ्यावरील प्लास्टिक व इतर कचऱ्याची सफाई नियमित व्हावी या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुमारे एक कोटी रुपये किमतीची पाच यंत्र पालघर जिल्ह्यातील किनारा लगतच्या गावाला दिली आहेत. मात्र या यंत्रांसाठी लागणारे इंधन व मनुष्यबळ पुरवण्यासाठी आर्थिक पाठबळ संबंधित ग्रामपंचायतीकडे नसल्याने आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता मोहीम अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत व सहकार्याने राबविण्यात आला.
‘सेवा पर्व २०२५’ आणि आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनारी भव्य बीच क्लिनिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक व अन्य कचऱ्याचे निर्मूलन करून किनारपट्टी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन, शाळा-विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक नागरिक, एनसीसी-एनएसएस स्वयंसेवक, महिला बचत गट, व्यापारी, उद्योजक तसेच विविध विभागांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमात लाभला. या ग्रामपंचायतीकडे स्वयंचलित किनारा स्वच्छता यंत्र असताना देखील त्याचा वापर याप्रसंगी करण्यात न आल्याने शासनाने दिलेल्या निधीचा अपेक्षित वापर होत असल्याचे दिसून आले आहे.
या स्वच्छता मोहिमेत जमा झालेला कचरा वर्गीकृत करून सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यात आला. मोहिमेमुळे समुद्रकिनारी प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संवर्धन, मत्स्य व्यवसायाला चालना, समुद्रकिनारी पर्यटनाला गती तसेच स्थानिक समाजामध्ये जागरूकता वाढेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्यासह केंद्रीय पर्यवेक्षक जुनेद आलम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) इजाज अहमद शेख, पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, गटविकास अधिकारी पालघर राहुल काळभोर, शिक्षणाधिकारी (योजना) शेषराव बडे, केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी संदीप किणी तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, घोषवाक्य लेखन, सायकलिंग, कुंडी रंगवणे आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या सहकार्याने हाती घेतलेली ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नाही तर केळवे सारख्या पर्यटन स्थळांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत बनविण्यासाठीही उपयुक्त आहे. ग्रामपंचायतींनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करून पर्यटन विकासालाही चालना द्यावी असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले. कार्यक्रमात नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, स्थानिक बचत गट व सामाजिक संघटनांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘स्वच्छ किनारा – सुंदर किनारा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन केले.
स्वयंचलित यंत्र पडली धूळ खात
किनारा स्वच्छतेसाठी असणारी स्वयंचलित यंत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्ह्याला पुरवली आहेत. सुमारे एक कोटी रुपयांचे प्रत्येक यंत्र हे सन २०२२ मध्ये केळवे ग्रामपंचायतीला दिले होते तर फेब्रुवारी २०२४ मध्ये अर्नाळा, बोर्डी, नांदगाव व शिरगाव या चार ग्रामपंचायतीला देण्यात आले. हे यंत्र चालवण्यासाठी ताशी सुमारे आठ ते १० लिटर डिझेल लागत असून त्याला दोन कुशल कर्मचाऱ्यांची जोड लागत आहे. ग्रामपंचायतचे आर्थिक स्त्रोत मर्यादित असल्याने या ग्रामपंचायती किनारा स्वच्छतेचे स्वयंचलित यंत्र प्रभावीपणे चालवत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची सामग्री उपलब्ध असताना जिल्हा प्रशासनाला कर्मचारी विद्यार्थी व नागरिकांच्या मदतीने किनारा स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे होत आहे.
सरपंचांची बैठक
या स्वच्छता मोहिमे पूर्वी केळवे व शिरगाव येथील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या समक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्वयंचलित किनारा स्वच्छता यंत्र चालवण्यासाठी येणाऱ्या अडचणींची माहिती सरपंच यांनी मनोज रानडे यांना दिली. त्यावर ही यंत्रसामुग्री चालवण्यासाठी ग्रामपंचायतींना भेडसावणारी आर्थिक अडचण सोडवण्यासाठी सामाजिक दायित्व फंडाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील व त्यासंदर्भात लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील असे त्यांनी संबंधितांना सांगण्यात आले.
किनारा स्वच्छता करण्यासाठी असणारी स्वयंचलित यंत्र सामग्री प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने प्राप्त झाली आहे. त्यापैकी केळवे व शिरगाव येथील किनारा स्वच्छता स्वयंचलित यंत्र चालवण्यासाठी आवश्यक इंधन व मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामाजिक संस्थांची व कॉर्पोरेट उद्योगांमधील सामाजिक दायित्व फंडाची मदत घेण्याचे योजिले जात आहे. – मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर