पालघर : पालघर नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे काम अत्यंत गोपनीयतेने हाताळण्यात आले असून कोणत्याही राजकीय व्यक्ती, माध्यमे किंवा इतर व्यक्तींना याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत केलेल्या तक्रारी चुकीच्या आणि निराधार असल्याचे पालघरचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी स्पष्ट केले आहे. तरी देखील प्रारूप प्रभाग रस्तेबाबत नागरिकाना हरकती असल्यास त्यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत नोंदवण्याचे आवाहन पालघरचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी केले आहे.

पालघरच्या नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे कामकाजात दोष असल्यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये उपस्थित केलेले मुद्दे चुकीचे असल्याचे व तथ्य नसल्याची भूमिका नगर परिषदेने घेतली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी यावर खुलासा देत नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार १२ जून २०२५ रोजी प्रभाग रचना समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने जनगणनेच्या १५ प्रगणक गटांची माहिती तपासली, गुगल मॅपवर नकाशे तयार केले आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन सीमा तपासल्या, हा प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा २३ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. एकूण ३० सदस्यांची संख्या गृहीत धरून १५ प्रभाग तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

नगरपरिषद क्षेत्रामधून पूर्वी २८ नगरसेवकांची निवड करण्यात येत असे. ही संख्या ३० झाल्याने प्रत्येक प्रभागात लोकसंख्या तुलनात्मक कमी झाली असून त्यामुळे प्रभाग रचनेत काही प्रमाणात बदल झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले की, राजकीय दबावापोटी प्रारूप प्रभाग रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, या प्रारूप प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील. ज्या नागरिकांना काही आक्षेप किंवा सूचना नोंदवायच्या असतील, त्यांनी मुख्याधिकारी, पालघर नगर परिषद यांच्याकडे नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर गांभीर्यपूर्वक पडताळणी करण्यात येईल असे नगर परिषदेतर्फे सांगण्यात आले.

प्रारूप प्रभाग रचना करताना पाळलेले नियम

लोकसंख्या मर्यादा : प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी किंवा १० टक्के जास्त ठेवण्यात आली आहे.

नैसर्गिक सीमा : प्रभागांच्या सीमा निश्चित करताना मोठे रस्ते, गल्ल्या, नाले, डोंगर यांसारख्या नैसर्गिक सीमा विचारात घेण्यात आल्या आहेत.

प्रगणक गट : कोणताही प्रगणक गट फोडण्यात आलेला नाही.

सीमा वर्णन : प्रत्येक प्रभागाच्या सीमांचे वर्णन उत्तर-पूर्व-दक्षिण आणि पश्चिम दिशांनुसार केले आहे.

गोपनीयता : संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडण्यात आली असून, कोणत्याही राजकीय दबावाखाली ही रचना तयार करण्यात आलेली नाही.