पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तींनी त्याची हत्या करून मृतदेह मध्य वैतरणा नदीपात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुलै महिन्यात व दीड वर्षांपूर्वी देखील या भागात असेच मृतदेह सापडण्याचे प्रकार घडलेले आहेत.

मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत सापडलेला मृतदेह हा नाशिक येथील इगतपुरी तालुक्यातील शरद कोंडाजी बोडके (३१) या तरुणाचा आहे. अज्ञात व्यक्तींनी त्याची हत्या करून मृतदेह मध्य वैतरणा नदीपात्रात फेकून दिला असल्याचे निष्पन्न होत आहे. या प्रकरणी मोखाडा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोखाडा येथील वैतरणा नदीपात्र हे एक निर्जन ठिकाण असून हा अधिकतर झाडाझुडपांचा भाग असल्याने या भागातून वाहतूक देखील कमी असते. तसेच मोखाडा हे नाशिक इगतपुरी हद्दीलगत असल्याने तेथे एखादी घटना घडली अथवा इतर काही कारणातून हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह या भागात फेकण्याच्या घटना या अगोदर देखील घडल्या आहेत. मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव वैतरणा पुलाखाली १२ जुलै २०२५ रोजी एका अनोळखी पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळला होता. त्याच ठिकाणी ३ फेब्रुवारी २०२४ रोजी एका अनोळखी महिलेचे प्रेत सापडले होते. याबाबत मोखाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर पालघर स्थानिक गुन्हे शाखा व मोखाडा पोलीस ठाणे यांनी या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले होते.

नाशिक येथील या तरुणाच्या खूणाबाबत गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. मारेकऱ्यांविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर जी व्यक्ती मारेकऱ्यांविषयी ठोस माहिती देईल आणि ज्यामुळे गुन्हा उघडकीस येईल, अशा व्यक्तीला पालघर जिल्हा पोलिसांकडून ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

या संदर्भात कोणतीही माहिती असल्यास पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले (८६६८७३१५५०) किंवा पी.एच. भास्कर कोठारी (८२३७४७११२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मोखाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.