पालघर : पालघर पोलिसांनी मोखाडा येथे केलेल्या कारवाईत १११ किलोपेक्षा जास्त अफू आणि एक कार असा एकूण १५ लाख ८० हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२१ जुलै रोजी पहाटे २.०२ वाजता मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शशिकांत भोये आणि पोलिस अंमलदार बापू नागरे रात्रीची गस्त घालत असताना, मोखाडा-त्र्यंबक रोडवर एक कार भरधाव वेगाने जात असताना त्यांना संशय आला. पोलिसांनी तात्काळ कारचा पाठलाग केला असता मौजे चिचुतार गावाजवळ कार चालकाने अंधाराचा फायदा घेऊन गाडीची चावी काढून पळ काढला.
पोलिसांनी तात्काळ गाडीची तपासणी केली असता, त्यात ७ लाख ८० हजार ३४० रुपये किमतीचा, १११.४२० किलोग्रॅम वजनाचा अफू वनस्पतीचे सुकलेल्या बोडांचा चुरा आढळून आला. तसेच गाडीच्या दोन बनावट नंबर प्लेट्स आणि ८ लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण १५ लाख ८० हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, मोखाडा पोलीस ठाणे करत आहेत. अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.