बोईसर : भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस उत्तर कोकणातील पालघर जिल्हा आणि मुंबई महानगर प्रदेशात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याच्या शक्यतेने पालघर जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार, वीटभट्टी व्यावसायिक धास्तावले असून कामे आटोपण्याची लगबग सुरु झाली आहे.

मे महिन्याच्या सुरवातीस देशातील उत्तर भारत, राजस्थान, गुजरात इत्यादी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून महाराष्ट्रातील पालघर आणि मुंबई महानगर प्रदेशात अनेक ठिकाणी सहा मे ते आठ मे दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पालघर, वसई परिसरात २५ ते ५५ मिमी तर मुंबई ठाणे भागात १० ते ३५ मिमी पाउस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सोमवारी रात्रीच्या सुमारास बोर्डी-कोसबाड परिसरात हलक्या पावसाचा शिडकावा झाला असून मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सूर्या आणि वांद्री धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर डहाणू, पालघर तालुक्यातील शेतकरी उन्हाळी भातशेती करतात तर किनारपट्टी आणि ग्रामीण भागात चिकू, आंबा, जांभूळ, मोगरा, झेंडू , भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. डहाणू, पालघर, वाडा, विक्रमगड या तालुक्यांमध्ये वीटभट्टी व्यवसाय जोमात सुरु असून समुद्रकिनारी गावांमध्ये सुक्या मासळीचा व्यवसाय तेजीत आहे. मात्र अवकाळी पावसाने नुकसान होण्याच्या भीतीमुळे शेतकरी, बागायतदार, मच्छीमार आणि वीटभट्टी व्यावसायिक धास्तावले असून कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची धावपळ सुरु झाली आहे.

अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त

पालघर जिल्ह्यात रब्बी हंगामात सूर्या आणि वांद्री प्रकल्पाच्या पाण्यावर डहाणू आणि पालघर तालुक्यातील सरासरी १८४८ हेक्टर क्षेत्रफळावर उन्हाळी भातशेती केली जाते. मात्र यावर्षी शेतीसाठी पाणी वाहून नेणाऱ्या कालव्यांच्या दुरुस्तीची कामे सुरु असल्यामुळे प्रत्यक्षात फक्त ९३५ हेक्टर क्षेत्रफळावर उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. उजव्या तीर कालव्यावरील वाघाडी, सोनाळे, चारोटी, सारणी, निकावली, आंबिवली, म्हसाड, उर्से, साये-आम्बिस्ते, दाभोण, रानशेत, निकणे, साखरे, वणई,शिगाव, वाळवे या गांवातील भातपीक तयार झाले असून शेतकऱ्यानी भाताची कापणी सुरु केली आहे.

त्याचप्रमाणे पश्चिम किनारपट्टीवरील गावातील १९०७ हेक्टर क्षेत्रफळावर मिरची आणि १५१५ हेक्टर क्षेत्रफळावर चिकूचे उत्पादन तर ग्रामीण भागात १३४४२ हेक्टर क्षेत्रफळावर आंबा पीक घेतले जाते. उन्हाळी हंगामातील भात, मिरची, चिकू आणि आंबा या सर्व पिकांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून शेतकरी मजुरांच्या मदतीने पीक काढणीच्या कामाला लागला आहे. मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास भातपिके भिजण्याची व खाली पडण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यामुळे फळगळती होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.

कामे पूर्ण करण्यासाठी वीट भट्टी व्यावसायिक आणि मच्छीमारांची धावपळ

पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, वाडा, विक्रमगड या तालुक्यातील ग्रामीण भागात घरांच्या बांधकामासाठी आवश्यक विटांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात यावर्षी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल ६० हजार घरकुले बांधण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आल्याने विटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी विटा भाजण्याची लगबग सुरु असून काही ठिकाणी कच्च्या विटांचे मनोरे रचून ठेवण्यात आले आहेत. अशात अवकाळी पाउस आल्यास कच्च्या विटा भिजून व्यावसायिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. तर किनारपट्टीवरील मासेमारीसाठी प्रसिद्ध डहाणू, मुरबे, सातपाटी, वडराई या बंदरांवर बोंबील, मांदेली, सुकट, जवळा, सोडे, पाटा सारखी मासळी उन्हात सुकविण्यासाठी घालण्यात आली असून अवकाळी पावसाने ही सुकी मासळी देखील मातीमोल होऊन खराब होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागामार्फत सहा ते आठ मे दरम्यान पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी भात, परिपक्व फळे आणि भाजीपाला यांची काढणी करून घ्यावी. धान्य आणि जनावरांचा चार सुरक्षित ठिकाणी ठेवून घ्यावा. नवीन लागवड केलेली फळझाडे वादळी वाऱ्याने कोलमडून पडून नये यासाठी मातीची भर व काठीचा आधार द्यावा. कोसबाड कृषी विज्ञान केंद्रांमार्फत सर्व शेतकऱ्यांना हवामानाची अद्ययावत दैनदिन माहिती थेट त्यांच्या मोबाईलवर देण्याची सुविधा निर्माण केली असल्याची माहिती कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ विलास जाधव यांनी दिली.