पालघर : पालघर पूर्वेकडील सेंट जॉन अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे (जुना मनोर रोड) जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर पावसाळ्यापुर्वी पासून पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांनी नगर परिषदेची निष्क्रियता उघड केली असून, या भागातील रिक्षाचालकांनी स्वखर्चाने खड्डे बुजवून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली आहे. पालघर शहराच्या विकासासाठी नेमलेल्या नगर परिषदेचा निधी आणि कर्तव्य कशासाठी आहे, असा संतप्त सवाल या घटनेनंतर नागरिक विचारत आहेत.
पालघर पूर्वेकडील सेंट जॉन महाविद्यालय ते रेल्वे स्टेशन पूर्व पर्यंतच्या या रस्त्यावरून दररोज जवळपास चार हजार विद्यार्थी आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या १५० हून अधिक रिक्षा प्रवास करतात. या परिसरात औद्योगिक कारखाने, शाळा आणि महाविद्यालये मोठ्या संख्येने असल्याने कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी रहदारी असते. सकाळी साडेसातपासून सुरू होणारी ही रहदारी सायंकाळी उशिरापर्यंत कायम असते.
सेंट जॉन महाविद्यालयापासून घोलविरा नाक्यापर्यंतचा रस्ता पावसाळ्यापूर्वी काँक्रिट करण्यात आला असला तरी, घोलविरा नाक्यापासून स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता आजही अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. या रस्त्यावर चार ते पाच फूट रुंद आणि दीड फूट खोल असे महाकाय खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात नगर परिषदेने दोन वेळा सिमेंट मिश्रित खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला, पण ती पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने खड्डे ‘जैसे थे’ राहिले. इतकेच नव्हे, तर टाकलेली खडी वाहनांच्या चाकाखाली येऊन उडून पादचारी आणि शेजारील वाहनचालकांना लागल्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
रोजच्या जीवघेण्या त्रासाला कंटाळून वेवूर, वीरेंद्रनगर आणि डुंगीपाडा परिसरातील रिक्षाचालकांनी एकत्र येऊन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. प्रशासनाच्या भरवशावर न राहता, त्यांनी स्वत:च्या खर्चाने माती, खडी आणि सिमेंटचे मिश्रण घेतले आणि रविवारी घोलविरा फॉरेस्ट ऑफिस समोरील रस्त्यावर तसेच सेंट जॉन रस्त्यावरील काही प्रमुख खड्ड्यांमध्ये टाकून दुरुस्तीचा प्रयत्न केला.
पुढील एक-दोन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. “निवडणुकांच्या तोंडावरच हे खड्डे दुरुस्त होणार का?” असा संतप्त सवाल नागरिक आणि रिक्षाचालक विचारत आहेत. जनतेच्या कररूपी पैशातून कामे न करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रिक्षाचालकांनी दाखवलेल्या या स्वावलंबनाच्या आणि सामाजिक जाणीवेच्या कृतीमुळे पालघरकरांमध्ये एक सकारात्मक संदेश पोहोचला आहे, पण त्याच वेळी शहरातील सामान्य नागरिकांमध्ये पालघर नगरपरिषदेच्या प्रति तीव्र नाराजी आणि असंतोष पसरला आहे.
पावसाळा संपूनही नगर परिषदेला ‘उघडीप’ मिळेना
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगर परिषदेने ‘पावसाचे कारण’ पुढे करून कायमस्वरूपी तोडगा काढला नाही. आता पावसाने उघडीप घेऊन अनेक दिवस झाले आहेत. खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेणे आवश्यक असताना, नगर परिषद अद्यापही ‘पुढाकार’ घेताना दिसत नाही. गणपती, नवरात्र यांसारखे सण नागरिकांना याच खड्ड्यांतून प्रवास करत साजरे करावे लागले आणि आता दोन आठवड्यांवर आलेल्या दिवाळीसारख्या मोठ्या सणालाही रस्त्यावरील खड्ड्यांचे ‘विघ्न’ कायम राहण्याचे चित्र दिसत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक आणि रिक्षाचालकांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
रिक्षाचालकांनी खड्डे बुजविणे ही घटना कौतुकास्पद नसून नगर परिषदेच्या अपयशाचे लक्षण आहे. लोकप्रतिनिधी, जिल्हा व नगर परिषद प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेचा निधी जनतेच्या कामांसाठीच वापर होत नसल्याने नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जर कामात पुढाकार घेत नसेल, तर अशा संतप्त प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. – मनोज घरत, रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष