पालघर : पालघर शहरातील सोनोपंत दांडेकर मार्गावरील (माहिम रोड) आयसीआयसीआय बँक ते स्वातंत्रवीर सावरकर चौक (वळणनाका) कृषी संशोधन केंद्रापर्यंत नगरपरिषदेने केलेले कॉंक्रीटचे मजबूत दुभाजक , व्यवस्थे मध्ये ठेवलेले छेद तसेच या मार्गावर गेल्या काही वर्षात झालेले अतिक्रमणामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरील दुभाजक दूर करा अथवा अतिक्रम हटवा अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.
पालघर नगर परिषदेने माहीम मुख्य रस्त्यावर १४५० मिटर लांबीच्या दुभाजक उभारणी नगरपरिषदेकडून करण्यात अली असून या कामाकरिता ५८ लाख रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. मुळातच अतिक्रमणामुळे अरुंद असलेल्या या मार्गावर दुभाजक उभारल्यामुळे रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. त्यात रस्त्याच्या कडेला बसलेले हॉकर व फेरीवाल्यांनी देखील अधिकतर रस्ता व्यापला आहे. त्यामुळे वाहतुकी दरम्यान अनेकदा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अपघाताच्या घटना घडत असतात.
माहिम रोड हा अरुंद असून त्यात रस्ता रुंदीकरण न करता दुभाजक टाकण्याची इतकी घाई कशासाठी आणि कोणासाठी केली असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पदपथावर अतिक्रमणे झालेली असून या मुख्य रस्त्यावरुन पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत चारचाकी आणि दुचाकींची तुफान वाहतूक सुरु असते. याशिवाय औद्योगिक कंटनर्स, बस, अवजड मालवाहू वाहने भरधाव वेगाने येत जात असून या गाड्यां च्या वेगावर नियंत्रण नसल्याने या भागात वारंवार अपघात होत असतात. दोन दिवसांपूर्वी वागुळसार जवळ कंटेनरची दुचाकीला धडक बसून एका बहिणभावंडांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर भरधाव वेगाने दुचाकी आणि कंटेनर्स यांच्या वाहतूकीत या पुढील काळात माहिम रोडवर भयानक मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अरुंद रस्ते आणि दुभाजक यामधून एकमेकांना ओव्हरटेक करताना खूप गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी नगरपरिषदेने दुभाजकांमध्ये दिलेले छेद बंद करावे, तसे शक्य नसल्यास बांधलेले दुभाजक हटवावे अथवा रस्त्या कडेला झालेले अतिक्रमण दूर करावे अशी मागणी नागरिकांकडून येत आहे.
मुळात या इतक्या मजबूत कॉंक्रीटच्या दुभाजकांची गरजच काय? वाहतूकीला शिस्त लागावी हा उदात्त हेतू नगरपरिषदेचा असेलही पण या दुभाजकांऐवजी फायबरचे लवचिक दुभाजक लावूनही तो हेतू साध्य होऊ शकला असता आणि रस्ता रुंदीकरण, पदपथावरील अतिक्रमणे हटविणे या गोष्टी आधी करण्याऐवजी ताबडतोब रस्ता दुभाजक टाकण्याची घाई कशासाठी केली? – सचिन परांजपे (पालघर)
पालघर नगर परिषदेकडे पूर्णवेळ मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने या पदावर पूर्णवेळ अधिकारी यांची नेमणूक झाल्यानंतर दुभाजक उभारणीत ठेवण्यात आलेल्या छेद ची पाहणी करण्यात येईल. वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांचा अभिप्राय घेऊन नंतर कारवाई करण्यात येईल. अतिक्रमण विषयक नगरपरिषद लवकरच कारवाई आरंभ होणार आहे. – उद्देश काटकर, नगर अभियंता, पालघर नगरपरिषद