पालघर : पालघर नगरपरिषद हद्दीतील खड्डे बुजवण्यासाठी नगरपरिषदेकडून फेब्रुवारी महिन्यात 25 लाखांची निविदा काढण्यात आली होती. मात्र रस्त्यांची स्थिती पाहता व पूर्वीच्या तुलनेत वाढलेले खड्डे पाहता या लाखो रुपयांमध्ये कोणत्या भागातले खड्डे नगर परिषदेने बुजवले व जे अद्याप नागरिकांच्या निदर्शनास पडले नाही असा सवाल नागरिक करत आहेत.
पालघर नगर परिषद क्षेत्रातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम असून या खड्ड्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात २५ लाख रुपयांची निविदा काढून खड्डे भरण्यात आल्याचे नगर परिषदेने सांगितले होते. याची बिले कंत्राटदाराला देण्यात आली आहे. मात्र पालघरमधील अनेक मुख्य रस्त्यांवरील खड्डे अजूनही तसेच आहेत, तर काही ठिकाणी पावसाळ्यात नवीन खड्डे पडले आहेत. विशेषतः पालघर पूर्वेकडील काही खड्डे बुजवण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी संपूर्ण निधी पूर्वेकडील कामांवर खर्च झाल्याने उर्वरित पालघर पश्चिम भागातील खड्ड्यांसाठी निधीच उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याव्यतिरिक्त पूर्वेकडे पश्चिमेच्या तुलनेत कमी खड्डे असल्याचे देखील दिसून येत असल्याने हा निधी नक्की पूर्वेकडे कुठे वापरला याबाबत शंका उत्पन्न होत आहे.
नागरिकांचा आरोप
नागरिकांकडून नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे, कारण कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप होत आहे. तसेच पालघर शहरातील खड्डे बुजवण्यासाठी साधारणतः ६ ते ७ लाख रुपये खर्च अपेक्षित असताना २५ लाखांचे टेंडर काढणे आणि त्यातील २० लाख रुपये खर्च होऊनही स्थिती न सुधारणे हे भ्रष्टाचाराचे स्पष्ट संकेत देते. अपूर्ण काम असताना घाईघाईने बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
नागरिकांचे हाल
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आबालवृद्ध, शालेय विद्यार्थी आणि महिलांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक अपघातही झाले असून त्यात महिलांची संख्या अधिक आहे. किरकोळ अपघात नित्याचे झाले असून मोठा अपघात होऊन एखादा मृत्यू होण्याची नगरपरिषद वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या अगोदर अनेक वेळा पालघरमधील तरुणांनी, रिक्षा चालकांनी, समाजसेवी संस्थांनी तसेच प्रवासी वर्गाने स्वखर्चाने डबर आणि विटा वापरून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला.
याबाबत नगरपरिषदेचे संबंधित नगर अभियंता उद्देश काटकर यांच्याशी संपर्क साधला असता खड्डे भरणीच्या कामासाठी फेब्रुवारी महिन्यातच निविदा काढण्यात आली असून त्यातून मार्च एप्रिल महिन्यात पूर्वेला व पश्चिमेला खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली. पावसाळ्यामध्ये पडलेले खड्डे हे नवीन असून जुने खड्ड्यांना काहीच झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवीन खड्डे हे वार्षिक ठेक्याच्या देखभाल दुरुस्ती मधून दुरुस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.