पालघर : काटेकोर पद्धतीने नियोजन तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकार खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ यामुळे सांसद खेल महोत्सवामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे दिसून आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक खासदाराने आपल्या मतदार संघात अशा स्वरूपाचे क्रीडा महोत्सव आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पालघरची खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पालघर या जिल्ह्या मुख्यालयाच्या ठिकाणी या खेल महोत्सवाचे आयोजन केले होते. या खेल महोत्सवासाठी सुमारे सव्वा सहा लाख खेळाडूंनी विक्रमी नोंदणी केली होती.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस सुरू राहिल्याने या खेळाच्या आयोजनात अनेक अडथळे निर्माण झाले होते. पावसामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करत आयोजकांनी तंबूची उभारणी करून त्यामध्ये लंगडी, व्हॉलीबॉल, खोखो व कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले तर शहरातील बंदिस्त सभागृहांमध्ये योगासन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबरीने पोलीस परेड मैदानावर ऍथलेटिक्स व इतर मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले असून एकंदर सुमारे २५ हजार खेळाडू या क्रीडा महोत्सवाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
या स्पर्धेत १२, १४ व १७ वर्षाखालील मुला मुलींच्या स्वतंत्र स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल चे १८३ संघ, लंगडीचे १२७ संघ, खो खो चे २१५ संघ तर कबड्डीचे २७० संघ सहभागी झाले होते.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच सुसज्ज मैदान व स्पर्धात्मक वातावरणात विविध खेळांमध्ये सहभाग घेतल्याचे त्यांच्या शिक्षकांकडून सांगण्यात आले. इतर संघांची कामगिरी पाहून आपल्या विद्यार्थ्यांचा स्तर व आत्मविश्वास उंचावेल तसेच आगामी काळात या लहानग्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांमध्ये वृद्धी होईल असे देखील सहभागी झालेल्या शाळा आश्रम शाळा, खाजगी शाळांच्या शिक्षकांकडून सांगण्यात आले.
पालघर जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या स्वरूपात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सांसद खेल महोत्सवाच्या निमित्ताने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या लाभ आगामी काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होऊन त्यांची क्षमता वाढण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी क्रीडा महोत्सवाच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला.
क्रीडा संकुल लवकर पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे आश्वासन
पालघर येथे जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी सुरू असून या संकुलाच्य उभारणीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांसदखेल महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगितले.
गडचिरोली पाठोपाठ पालघर जिल्ह्यात झपाट्याने प्रगती व विकास होईल असे सांगत जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी भान ठेवून काम करत असल्याचे त्यांनी याप्रसंगी प्रतिपादन केले.
