पालघर : वादळी परिस्थिती व तुफान पावसामुळे समुद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यावर पालघर जिल्ह्यातील सातपाटी सह इतर सर्व बंदरामधील बोटी किनाऱ्यावर पोहोचल्या. मात्र सातपाटी येथील खाडीत साचलेला गाळ व चिखलामुळे निम्म्या बोटी जेट्टीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. याच दलदलीच्या परिस्थितीमधून बर्फ, इंधन व इतर जीवनोपयोगी साहित्याची वाहतुक करून समुद्र शांत झाल्याने या बोटी पुन्हा मासेमारी करिता समुद्रात रवाना होण्यास प्रारंभ केला.
सातपाटी खाडी क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रातील गाळ (वाळू) साचला असून या गाळामुळे पाच लहान – मोठ्या आकाराची बेट निर्माण झाली आहेत. त्यामुळे बोटीच्या आकारमानात प्रमाणे तसेच त्यामध्ये असणाऱ्या वजनाच्या अनुषंगाने बोटीला नव्याने उभारलेल्या जेट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी चार ते पाच मीटर पाण्याच्या पातळीची आवश्यकता असते. या अनुषंगाने मोठ्या बोटी षष्टी-सप्तमी ते नवमी-दशमी (ज्याला भांग असे संबोधले जाते) यादरम्यान सातपाटी किनाऱ्यावर व परिणामी जेटीवर येण्याचे टाळतात.
पालघर जिल्ह्यात असणाऱ्या २०१८ मासेमारी बोटींपैकी यंदाच्या आर्थिक वर्षात १९११ बोटीने मत्स्यव्यवसाय विभागाकडून परवाने घेतले असून त्यामध्ये सातपाटीच्या १९०- २०० बोटीचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर व समुद्रात मुसळधार पावसासह वादळी परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीय हवामान विभागाने सावधानतेचा इशारा देऊन बोटीने बंदरामध्ये परत येण्याचे आवाहन केले होते.
या अनुषंगाने सातपाटी गावातील मासेमारीसाठी समुद्रात असणाऱ्या सुमारे १०० बोटी २८ सप्टेंबर रोजी सातपाटी लगतच्या खाडीमध्ये दाखल झाल्या होत्या. मात्र त्यादिवशी षष्टी उलटून गेल्याने भरती व ओहोटी दरम्यान पाण्याची पातळी कमी झाल्याने तसेच गाळामुळे निर्माण झालेल्या छोटी बेट ओलांडून बोटीने खाडी क्षेत्रातून ४० ते ६० मीटर अंतरावर असणाऱ्या जेट्टीपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे मासेमारी केलेले उत्पन्न चिखला मधून मार्ग काढत जेट्टी पर्यंत पोहोचविण्यात आले होते.
सातपाटी खाडीतील पाण्याची पातळी ३ ऑक्टोबर पर्यंत बोटीने जेटीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक प्रमाणात उपलब्ध राहणार नसल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने पुरविलेल्या भरती ओहोटीच्या तपशिलावरून स्पष्ट होत होते. समुद्रातील वातावरण शांत झाल्याने बोटीना समुद्रात मासेमारी करण्यासाठी परतीचे वेध लागल्याने अशाच चिखलमय परिस्थितीमधून बर्फ, इंधन, खाद्य सामग्री व इतर मासेमारी साहित्य पोहोचवून काही बोटीने परतीचा प्रवास सुरू केला आहे.
गाळ काढण्यास शासनाला अपयश
सर्वसाधारणपणे मध्यम मोठ्या आकारांच्या मासेमारी बोटींना जेट्टी पर्यंत पोहोचण्यासाठी साडेचार मीटर पाण्याची उंचीची आवश्यकता असताना त्याची पूर्तता भांग कालावधीत होत नसल्याने अनेक मच्छिमार बोटीना त्याचा फटका बसत आहे. सातपाटी येथे साचलेला गाळ ड्रेसिंग द्वारे काढण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू असले तरीही त्याला आजवर यश लाभलेले नाही.
खाडी क्षेत्रातील साचलेला गाळ जमिनीवर काढल्यास त्याला गौण खनिज स्वामित्व रक्कम भरणे प्रचलित कायद्यानुसार आवश्यक असून गाळांमधील वाळूचे प्रमाण व दर्जा समाधानकारक नसल्याने या गाळाची किनाऱ्यावर आणून विक्री करणे व्यवहारीन असल्याचे दिसून आले आहे. तर शासनाने गाळ काढण्याच्या उपक्रमाबाबत दिलेल्या आर्थिक मंजुरी दरम्यान कामाचे उगम कोणत्या स्थानकातून करावे तसेच साचलेला गाळ समुद्रात वाहून नेण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी आल्याने हा मंजूर निधी परत गेल्याचे सांगण्यात येते. एकीकडे राज्य शासन वाढवण व मुरबे येथे व्यावसायिक बंदर उभारण्यासाठी प्रयत्नशील असताना सातपाटी व मुरबे गावातील खाडी मार्गात साचलेला गाळ काढण्यासाठी राज्य शासन उदासीन असल्याचे दिसून आले आहे.
सातपाटी येथील किनाऱ्यावर ओहटी भरती दरम्यान असणाऱ्या समुद्री पाण्याच्या पातळी चा तक्ता मीटर मध्ये
तारीख | भरती | ओहोटी |
२८/०९ | ४.४३ | २.७ |
२९/०९ | ४.१४ | २.९६ |
३०/०९ | ३.३८ | २.२७ |
१/१० | ३.७९ | २.९२ |
२/१० | ४.०१ | २.३७ |
३/१० | ४.३० | २.१६ |