पालघर : पालघर जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेषतः विद्यार्थिनींसाठी असलेल्या विविध पास योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जून महिन्यात जिल्ह्यात तब्बल २० हजार शालेय पासचे वाटप पूर्ण झाले असून यामध्ये अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एसटीचे पास थेट शाळेत मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचला आहे.
१६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सुरू झाल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के सवलत दिली आहे, म्हणजेच केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. या अंतर्गत ३,६४५ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी पास वितरित केले. त्याचप्रमाणे, शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना “मोफत” एसटी पासचे वितरण करण्यात आले. या अंतर्गत १५,६४३ विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करण्यात आले, तर मानव विकास योजनेअंतर्गत २,५४७ विद्यार्थिनींना मोफत पास मिळाले.
यापूर्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत. मात्र आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा – महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येत आहेत यामुळे विद्यार्थिनीमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे. तर प्रवासाअभावी शाळेला खंड पडणार नसल्याने शालेय व्यवस्थापनाकडून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शालेय बस फेऱ्या रद्द न करण्याचे निर्देश
जून महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, लाखो विद्यार्थी एसटीच्या बसेसने शाळेला जातात. त्यांच्यासाठी हजारो शालेय फेऱ्या एसटीने सुरू केलेल्या आहेत. परंतु, विविध कारणांनी काही फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात अशा तक्रारी शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून येत आहेत.
विशेषतः आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना एकच बस फेरी उपलब्ध असल्याने ती रद्द झाल्यास त्यांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे, यापुढे प्रत्येक आगार प्रमुखाने आपल्या कार्यक्षेत्रातील शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाकडून अहिल्याबाई होळकर पासेस योजनेअंतर्गत ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना तसेच मानव विकास योजना अंतर्गत विद्यार्थिनींना शाळेत प्रवास करण्यासाठी मोफत पासेसचे वितरण करण्यात येते. जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या मोफत पासेसचा लाभ घ्यावा. – कैलास पाटील, विभाग नियंत्रक, रा. प. पालघर विभाग.
वाटप झालेल्या पासेसची आकडेवारी (जून महिना)
- विद्यार्थी पासेस : ३,६४५
- अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी मोफत पासेस : १५,६४३
- मानव विकास विद्यार्थिनी मोफत पासेस : २,५४७