बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कचरा लगतच्या गावातील निर्जन परीसरात टाकून त्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची बोईसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यानी रासायनिक कचर्याचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून निघणारा रासायनिक घनकचरा आणि औद्योगिक सांडपाण्याचे औद्योगिक परीसराच्या लगत असलेल्या कोलवडे, कुंभवली, पाम, सालवड, पास्थळ, सरावली, बेटेगाव या गावांच्या हद्दीत असलेल्या नैसर्गिक नाले, ओढे आणि खाडीच्या निर्जन परीसरात बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार होत आहेत. बोईसर पालघर रस्त्यावरील पंचाळी गावाजवळील निर्जन जागेत रासायनिक कचरा टाकण्यात येऊन त्याला आग लावून विल्हेवाट लावण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.
रासायनिक कचर्याला लागलेल्या आगीची खबर तारापूर अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण मिळवले. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश अस्वार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने रासायनिक कचर्याचे नमुने ताब्यात घेत तपासणीसाठी प्रयोगगशाळेत पाठवले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई निश्चित केली जाणार आहे.
रासायनिक घनकचरा आणि औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट :
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांमधील रासायनिक कचरा आणि औद्योगिक सांडपाण्याची लगतच्या गावाजवळील निर्जन परीसरात बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार होत आहेत. खैरापाडा येथील गटारामध्ये रसायनाची बेकायदा विल्हेवाट लावण्याच्या प्रकारानंतर गोगटे नाका येथे विना परवानगी औद्योगिक सांडपाण्याची वाहतूक करणार्या तीन जणांविरोधात बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पालकमंत्री गणेश नाईक आणि जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी कठोर कारवाई करण्याच्या सूचना देऊन देखील रासायनिक घनकचरा आणि औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच आहेत.
पंचाळी येथे रासायनिक कचरा बेकायदा विल्हेवाटीप्रकरणी बोईसर पोलिस स्टेशनमधून पत्र मिळाले असून गोळा केलेले नमूने तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – विरेंद्र सिंह , उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर २
पंचाळी ग्रामपंचायत हद्दीतील निर्जन जागेत औद्योगिक घनकचरा फेकण्याचे प्रकार वाढत असून पोलिसांनी व प्रदूषण नियंत्रण मंडळाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी. – सुजाता पाटील, सरपंच पंचाळी ग्रामपंचायत