डहाणू : पालघर जिल्ह्यात कातकरी समाजाच्या मुलांसाठी पहिली विशेष आश्रमशाळा सुरू झाली आहे. खर्डी (वसई) इथे कातकरी विद्यार्थ्यांसाठी मंजूर आश्रमशाळा जागा उपलब्ध नसल्यामुळे सध्या डहाणू तालुक्यातील रानशेत इथे नव्याने सुरू करण्यात आली आहे. या शाळेचे उद्घाटन बुधवार ३० जुलै रोजी करण्यात आले. डहाणू तालुक्यातील रानशेत येथे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांच्या गावातील नर्सिंग कॉलेजची इमारत भाडेतत्त्वावर घेऊन ही शाळा उभारण्यात आली आहे. कातकरी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी मैलाचा दगड ठरणारी ही शाळा पहिली ते दहावीपर्यंत असून, सध्या पहिली आणि पाचवीचे वर्ग सुरू झाले आहेत.

या शाळेत सुरुवातीला पहिल्या इयत्तेत १० तर पाचव्या इयत्तेत २५ विद्यार्थी दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी तीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना सेंट्रल किचनमधून जेवणाची व्यवस्था केली जात आहे. कातकरी कुटुंबे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत असल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण अपूर्ण राहायचे. तसेच, अनेक ठिकाणी कातकरी कुटुंबे वेठबिगार म्हणून काम करत असल्याने मुलांनाही वेठबिगारी करावी लागत असे. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

या आश्रमशाळेच्या निर्मितीमागे विवेक पंडित यांचे महत्त्वपूर्ण प्रयत्न आहेत. पालघर जिल्ह्यातील ३ आणि रायगड जिल्ह्यातील २ अशा एकूण ५ आश्रमशाळा यापूर्वी बंद पडल्या होत्या. पंडित यांनी या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे रायगडमधील १ आणि पालघरमधील १ आश्रमशाळा पुन्हा सुरू झाली आहे. पालघर मधील पुन्हा सुरू झालेली आश्रमशाळा फक्त कातकरी मुलांसाठी ठेवण्यात आली असून ही पालघर मधील पहिली कातकरी मुलांची आश्रमशाळा ठरली आहे.

या शाळेचे उद्घाटन राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समीतिचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना विवेक पंडित यांनी सांगितले की, पालघरमधील तीन आश्रमशाळा बंद असल्यामुळे त्या सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पालघर आणि रायगडमधील एकूण पाच शाळा बंद पडल्या होत्या. यापैकी पालघरमध्ये एक आणि रायगड जिल्ह्यात एक शाळा फक्त कातकरी समाजासाठी असावी अशी आमची मागणी होती आणि ती मान्य झाली आहे.

उर्वरित तीन शाळांसाठीही प्रयत्न सुरू राहतील आणि या शाळांमध्ये कातकरी विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा प्रयत्न असेल. तसेच स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांना सक्तीने आश्रमशाळेत आणणे गरजेचे आहे आणि यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामसेवकांना ही जबाबदारी देण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यक्रमात उपस्थित पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी यावेळी विवेक पंडित आणि आदिवासी विकास विभागाचे आभार व्यक्त करून कातकरी मुलांच्या शिक्षणासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आश्वासित केले. तसेच कातकरी समाज हा व्यसनाधिनतेमुळे मुख्य प्रवाहातून बाजूला येत असून त्यांना व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज अधोरेखीत केली. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी अधिक प्रभावीपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित, गोपीचंद कदम, उपआयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे, विशाल खत्री, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू, कातकरी संघटनेचे रमेश सवरा सह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.