पालघर : पालघर शहरातील रेल्वे स्टेशन परिसर तसेच मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालघर पोलिसांनी सर्व संबंधित घटकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी बेकायदा पार्किंग होणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, रिक्षा स्टॅन्डचे विकेंद्रीकरण करणे, शेअर रिक्षा प्रणालीसाठी स्वतंत्र स्टँड उपलब्ध करणे तसेच अतिक्रमण विरोधी पथकाला आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यास मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यापासून पालघर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून वाहतूक सुलभ होण्याची शक्यता आहे.

पालघर शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभा राऊळ तसेच वाहतूक शाखेची प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे उपस्थित होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर नगर परिषदेचे प्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी, रिक्षा युनियनचे प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी व नागरीक उपस्थित होते.

या बैठकीत रेल्वे स्टेशन परिसरात तसेच प्रमुख रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, रस्त्याकडेला बसणारे हॉकर्स व विक्रेत्यांवर कारवाई करणे, प्रमुख चौकात डावीकडे सहज प्रवास करण्याची (फ्री लेफ्ट) सुविधा नसणे, रिक्षा स्थानकांचे विकेंद्रीकरण करणे, शेअर रिक्षा प्रणालीला उत्तेजन देण्यासाठी स्वतंत्र स्टॅन्ड निर्मिती करणे, रस्त्याकडेला असणाऱ्या अनधिकृत होर्डिंग व पार्किंग केल्या जाणाऱ्या वाहनविरुद्ध कारवाई करणे, मोकाट गुरांच्या संख्येवर आळा आणले, आठवडी बाजार नियंत्रित ठेवणे, आठवडा बाजारात सुसूत्र चालणे, शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी पालकांच्या वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था करणे, स्कूल बस स्कूल व्हॅन विषयी नियमांचे पालन करणे, ऑनलाइन खाद्यपदार्थ वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षितता व वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, झेब्रा क्रॉसिंग तसेच गतिरोधक उभारणी करणे, राज्य परिवहन मंडळाच्या पूर्वेकडे जाणाऱ्या बसचे स्थलांतर विभागीय कार्यालयाच्या ठिकाणाहून करणे, पी वन पी टू पार्किंग व्यवस्था प्रभावीपणे राबविणे याबाबत सूचना देण्यात आल्या.

या बैठकीनंतर पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सर्व संबंधित शासकीय अधिकारी व पोलिसांची बैठक घेऊन पालघर येथे अतिक्रमण पथकाला आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त देण्याचे सूचित केले. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अवजड वाहन तसेच रिक्षा चालकांविरुद्ध कारवाई करण्यास त्यांनी वाहतूक विभागाला सूचना दिल्या असून परिवहन विभाग, नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत वाहतुकी संदर्भात उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना आखण्यासाठी पत्रव्यवहार करणे व संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याचे सांगण्यात आले. पालघर रेल्वे स्टेशन लगतच्या भागात अनेक तीन व सहा असली स्टॅन्ड जवळ जवळ असल्याने त्यांचे विकेंद्रीकरण करणे व प्रत्येक रिक्षा थांब्यावर मर्यादित रिक्षा उभ्या करण्याची व्यवस्था करताना इतर रिक्षांना दूरवर पार्किंग करण्यासाठी व्यवस्था उभारण्याचे देखील त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या.