तारापूरमध्ये अनेक ठिकाणी प्रदूषणाची मोजमाप करणाऱ्या यंत्रणेचा अभाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर: तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये वायुप्रदूषणाची मोजमाप करणारी प्रणाली अजूनही प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत विविध ठिकाणी न बसवल्यामुळे तसेच बसवलेली यंत्रणा कार्यान्वित न केल्याने येथील वायुप्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मंडळाच्या या बेफिकीर वृत्तीमुळे प्रदूषणकारी कारखाने थेट हवेमध्ये कारखान्यातील विषारी वायू बिनधास्तपणे सोडत असल्याचे दिसत आहेत.  त्यामुळे परिसरातील गावांना त्याचा धोका निर्माण झाला आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात सालवड, कुंभवली, पास्थळ, पाम, सरावली कोलवडे अशी अनेक गावे आहेत. अनेक कारखाने प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आखून दिलेली नियमावली न पाळता दूषित वायू, धूर, थेट हवेत सोडत आहेत. हा धूर व वायू आजूबाजूच्या गावांमध्ये पसरत असल्यामुळे त्याच्या दुर्गंधीमुळे  येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेक वेळा या गावांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारही केली आहे. मात्र मंडळाने या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप ही गावे करीत आहेत. वायुप्रदूषणामुळे गावातील झाडेझुडपे, भाजीपाला बागायती यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रदूषण थांबवण्याच्या दृष्टिकोनातून प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने उपाययोजना कराव्यात व नागरिकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी या निमित्ताने होत आहे.

औद्योगिक परिसरामध्ये वायुप्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने गस्ती पथक स्थापन केल्यास व कारखान्यांवर नियंत्रण ठेवल्यास वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे येथील काही ग्रामस्थ सांगत आहेत. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, तारापूर औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने रात्रीच्या वेळी वायुप्रदूषण करीत आहेत. अलीकडेच अशाच एका कारखान्याने आपला प्रदूषित वायू हवेत सोडल्यामुळे कोलवडे गावातील ग्रामस्थांना चक्कर येणे, मळमळणे, डोळे जळजळ करणे, अस्वस्थ होणे अशी लक्षणे आढळून आली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

औद्योगिक परिसरात होत असलेल्या वायुप्रदूषणामुळे बोईसरसारख्या मोठ्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे हे वायू प्रदूषण दूर करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळीच उपाययोजना करणे व त्याकडे जातीने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा बोईसर ग्रामपंचायत सदस्य अतुल देसाई यांनी व्यक्त केली आहे.  

ताशेरे ओढूनही यंत्रणेचे दुर्लक्ष

तारापूर येथील प्रदूषणाबाबत अनेक वेळा वसाहतीवर राष्ट्रीय हरित लवाद आसह अनेकांनी ताशेरे ओढले आहेत या प्रदूषणावर उपाय करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला वारंवार सूचित ही करण्यात आले होते मात्र प्रदूषण मंडळाची यंत्रणाच अपुरी पडत असल्यामुळे या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे. औद्योगिक वसाहत परिसराच्या परिघामध्ये अनेक गावे वसलेली आहेत वायू प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत कर्करोगासारखा भयंकर आजार बनवण्याचे ही दाट शक्यता तज्ज्ञ मंडळीमार्फत वर्तवली जात होती. त्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. गंभीर समस्या असतानाही मंडळ अजूनही वायुप्रदूषण मोजणारी यंत्रणा कार्यान्वित करत

नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.केंद्रीय मंडळाची सूचना केराच्या टोपलीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक औद्योगिक वसाहतीमध्ये वायुप्रदूषण होणाऱ्या कारखान्यांमध्ये व क्षेत्राच्या ठिकाणी वायुप्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तसेच या यंत्रणेतून दररोज मिळालेली माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संलग्न कार्यालये व जनहितार्थ जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र तारापूर औद्योगिक वसाहत परिसरात तसे केले जात नाही, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेला येथे केराची टोपली दाखवली असल्याचे आरोप होत आहेत

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem of air pollution persists lack of pollution measuring system in many places in tarapur akp
First published on: 10-11-2021 at 00:11 IST