पालघर : पालघर येथे दोन हवामान नोंदणी केंद्र आहेत. दोघांमध्ये दीडशे मीटरचे अंतर असतानाही त्यांच्या पर्जन्यमान नोंदणीमध्ये मोठ्या तफवतीचा फटका चिकू बागायतदारांना बसत आहे. १८ ते २६ जुलै २०२४ दरम्यान नोंदवण्यात आलेल्या पर्जन्यमानामध्ये ५० ते ६० टक्क्यांची तफावत असल्याचे आढळून आले आहे. या तफावतीमुळे बागायतदार संपूर्ण विमा रक्कम मिळण्यापासून वंचित राहिले आहे.
पालघरमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र तर त्यापासून दीडशे मीटर अंतरावर महावेधतर्फे (स्कायमेट) स्वयंचलित हवामान केंद्र (ऑटोमेटेड वेदर स्टेशन) आहे. गतवर्षी २१ जुलै २०२४ रोजी दोन्ही केंद्रांमध्ये समान पर्जन्यमानाची नोंद झाली होती. परंतु २५ व २६ जुलै रोजी महावेधमधील पावसाची नोंद कृषी संशोधन केंद्रातील पर्जन्यमानापेक्षा किंचितशी अधिक असल्याचे दिसून आले. तर इतर सर्व दिवशी महावेधच्या स्वयंचलित हवामान केंद्रातील पावसाची नोंद ही कृषी संशोधन केंद्राच्या नोंदीच्या ४५ ते ६७ टक्के कमी असल्याचे दिसून आली.
अडगळीत असलेल्या केंद्राच्या विश्वाासार्हतेचा प्रश्न
महावेध कंपनीने बसवलेले पालघर येथील स्वयंचलित हवामान नोंदणी केंद्र अडगळीच्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी या केंद्राला देण्यात आलेल्या सौरऊर्जा पॅनल मधील वायर जोडणी निघाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या ठिकाणी गेल्या काही महिन्यात कोणीही देखभाल दुरुस्ती अथवा साफसफाईसाठी आल्याची शक्यता आढळून न आल्याने अशा केंद्रामधून प्रसारित होणाऱ्या हवामान विषयक माहितीवरून शेतकऱ्यांचे भविष्य ठरवणार का असा सवालदेखील उपस्थित केला जात आहे.
नवीन मंडळांसाठी हवामान केंद्रांची आवश्यकता
जिल्ह्यात असणाऱ्या पूर्वीच्या २९ महसूल मंडळाच्या ठिकाणी महावेध कंपनीचे स्वयंचलित हवामान केंद्र कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात नवीन १६ मंडळ क्षेत्र निर्माण झाली. अशा ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी आजवर झाली नाही. त्यामुळे पूर्वीच्या मंडळाशी संलग्न भागातील संकलित हवामान विषयक माहितीचा आधार घेण्यात येतो. याचा फटका पालघर, माहीम व सफाळे येथील शेतकऱ्यांना झाल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. नव्याने निर्माण झालेल्या मंडळ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याच्या सूचना शासनाने महावेधला दिल्या आहेत.
पालघर कृषी संशोधन केंद्रात असलेल्या वेधशाळेत पर्जन्यमान व आद्र्रता यांच्या प्रत्यक्षात झालेल्या नोंदीची माहिती माहीमच्या शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. संशोधन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी स्वत: या नोंदी केल्या आहेत. –डॉ. अमोल दहिफळे, प्रमुख.पालघर कृषी संशोधन केंद्र.
खरीप २०२४ अंतर्गत महावेधकडून हवामान नोंदी मिळाल्या आहेत. ते पाहता विमा योजनेतील माणकेच्या आधारे माहीम, पालघर व सफाळे मंडळ क्षेत्रातील शेतकऱ्यांना चिकू पिक विमा योजनेचा लाभ देण्यात आल्याचे दिसून येते. –निलेश बागेश्वर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.
दोन हवामान केंद्रांमधील तफावत
(१८ ते २६ जुलै २०२४ )
पर्जन्यमान (मिलिमीटरमध्ये)
दिनांक कृषी संशोधन केंद्र महावेध टक्के
१८ जुलै ६० ३४ ५६
१९ जुलै २६ १४ ५३.८४
२० जुलै ४८ २९ ६०.४२
२१ जुलै ९१ ९१ –
२२ जुलै १५३ ७९ ५१.६४
२३ जुलै १५९ ७३ ४५.९२
२४ जुलै ५७ ३८ ६६.६७
२५ जुलै १०३ १०५ १०३
२६ जुलै ४१ ४२ १०२.४४
चिकू बागायदारांना फटका
पालघमधील दोन हवामान केंद्रातील पर्जन्यमानाच्या नोंदणीच्या तफावतीचा चिकू बागायदारांना फटका बसत असून त्याचा परिणाम त्यांच्या पिक विम्यावरील मिळणाºया रकमेवर होऊ लागला आहे.
खरीप २०२४ मध्ये चिकू फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील १९२५ शेतकरी सहभागी झाले होते. या योजनेअंतर्गत सलग आठ दिवस २० मिलिमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान व सलग १० दिवस ९० टक्क्यापेक्षा अधिक आद्र्रता असल्यास चिकू बागायतीला हेक्टरी ७० हजार रुपयांचे विमा कवच दिले जाते. याकरिता प्रत्येक बागायतदाराने हेक्टरी साडेतीन हजार रुपयांचा विमा हप्ता भरणे अपेक्षित असते. या योजनेत प्राप्त ३८३३ अर्जांवर २३.५३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली होती.
जिल्ह्यातील पालघर, माहीम व सफाळे व्यतिरिक्त इतर सर्व महसूल मंडळातील बागायतदारांना पूर्ण विमा कवच मिळाले होते. या मंडळातील विमा योजनेत सहभागी बागायतदारांना ३१,५०० रुपयांचे कवच दिले होते. मात्र यात काही बागायतदार संपूर्ण विमा कवचापासून वंचित राहिले होते. या बागायतदारांनी या संदर्भात वेगवेगळ्या पातळीवर दाद मागितली. त्यावेळी असे आढळून आले की, महावेधकडून नोंदवण्यात आलेल्या पर्जन्यमानात १९ जुलै रोजी अवघे १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे दाखवण्यात आली. तर याच केंद्रापासून केंद्रापासून अवघ्या १००-१५० मीटरवर असणाऱ्या पालघरच्या कृषी संशोधन केंद्रात त्याच दिवशी २६ मिलिमीटर पावसाची नोंद आढळली. १८ ते २६ जुलै दरम्यान या दोन केंद्रांमध्ये नोंदवण्यात आलेल्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे यावेळी दिसून आले. याच तफावतीचा फटका या चिकू बागायदारांना बसला असून ते संपूर्ण विमा रक्कम मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.
विश्वास कोणावर ठेवायचा?
कृषी संशोधन केंद्रामार्फत कृषी सल्ला नियमित दिला जातो. या केंद्रात प्रत्यक्षात पर्जन्यमापकाद्वारे झालेल्या पावसाची नोंद केली जात असताना त्यावर विश्वास न ठेवता महावेधच्या स्वयंचलित हवामान केंद्राच्या नोंदणी अनुसार चिकू विमा योजनेचा पूर्ण लाभ मिळण्यापासून वंचित ठेवले आहे. शासनाला कृषी संशोधन केंद्राच्या पावसाच्या नोंदणीवर विश्वास नसेल तर आम्ही त्यांच्या कृषी सल्ल्यावर कसा विश्वास ठेवायचा असा सवाल बागायतदारांनी उपस्थित केला आहे.