पालघर: यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पालघर एसटी विभागाने उत्पन्नाचा विक्रम नोंदवला आहे. ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत विभागाने तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे सर्वाधिक उत्पन्न ठरले आहे.
सणासुदीच्या काळात व विशेषतः श्रावण महिन्यात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी विविध योजना, उपक्रम व मोहीम राबविण्यात येत असते. श्रावण व गणेशोत्सवा करिता देखील एसटी विभाग सज्ज असून सवलतींमुळे अधिकार प्रवासी सणासुदच्या काळात एसटीला प्राधान्य देतात. यावर्षी नारळी पौर्णिमा (८ ऑगस्ट), रक्षाबंधन आणि जागतिक आदिवासी दिन (९ ऑगस्ट) तसेच रविवार (१० ऑगस्ट) अशा सलग सुट्ट्या आल्या. त्यामुळे कामावर असलेले अनेक प्रवासी आपल्या गावी, कुटुंबाकडे जाण्यासाठी बाहेर पडले. भाऊ-बहिणींचे नाते दृढ करणाऱ्या या सणाच्या निमित्ताने प्रवाशांनी एसटीच्या सेवेला पसंती दिली. याच गर्दीमुळे एसटी महामंडळाला विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.
या विक्रमी यशाबद्दल एसटी महामंडळाने प्रवाशांचे आभार मानले आहेत. तसेच, सणाच्या दिवशीही स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून, प्रवाशांची सेवा करणाऱ्या आणि कर्तव्य बजावत विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या सर्व एसटी चालक आणि वाहकांचे अभिनंदनही करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेसचे नियोजन
प्रवाशांची वाढती गर्दी आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पालघर विभागाने योग्य नियोजन केले होते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नाशिक, धुळे, कोल्हापूर आणि सोलापूर या मार्गांवर १० जादा बसेस सोडण्यात आल्या. याशिवाय रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईहून परतणाऱ्या प्रवाशांसाठी नालासोपारा ते ठाणे या मार्गावरही ५ अतिरिक्त बसेस चालवण्यात आल्या होत्या. या नियोजनामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला.
महिला प्रवाशांचा मोठा सहभाग
या चार दिवसांत लाखो प्रवाशांनी एसटीने सुरक्षित प्रवास केला, ज्यात महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. आपल्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी गावी जाणाऱ्या बहिणी आणि त्यांना आणण्यासाठी जाणारे भाऊ अशा प्रवाशांमुळे एसटी बस गर्दीने भरलेल्या होत्या.
या आठवड्यात देखील सलग सुट्ट्या
15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिन, 16 ऑगस्ट रोजी गोपाळकाला व 17 ऑगस्ट रोजी रविवारची सुट्टी असल्यामुळे या आठवड्यात देखील बाहेरगावी जाण्यासाठी व पर्यटनाकरिता निघणाऱ्या नागरिकांसाठी एसटी प्रशासन सज्ज असून सुट्ट्यांच्या कालावधीत व गणेशोत्सवा दरम्यान अधिकाधिक नागरिकांनी एसटी ने प्रवास करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी प्रवाशांना केले आहे.