बोईसर : बोईसर मध्ये दरोडा टाकण्याच्या इराद्याने आलेल्या चोरट्यानी सराफा दुकानावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. या गोळीबारात सराफा दुकानदार सुदैवाने बचावला असून घटनास्थळी पोचलेला पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
बोईसरच्या गणेश नगर परिसरात असलेल्या चतुर्भुज ज्वेलर्स या सराफा दुकानावर शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यानी भर दिवसा गोळीबार केला. दरोडा टाकण्याच्या इराद्याने आलेल्या चोरट्यानी सराफा दुकानदाराच्या दिशेने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. मात्र त्यांचा नेम चुकल्याने या हल्ल्यातून दुकानदार सुदैवाने बचावला. यानंतर घाबरलेल्या अज्ञात चोरट्यानी पिस्तूल घटनास्थळी टाकून पळ काढला. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पिस्तूल ताब्यात घेत पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
