तवा ग्रामपंचायतींतर्गत कोल्हान गावातील दगडी बांधकाम केलेली विहीर अजूनही सुस्थितीत
कासा : तवा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोल्हान गावामध्ये स्वातंत्र्यपूर्वकाळात गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी दगडी बांधकाम केलेली विहीर असून ती अजूनही सुस्थितीत आहे. या विहिरीतील पाणीही पिण्यायोग्य असल्यामुळे त्याचा वापर येथील ग्रामस्थ करीत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत असताना कोल्हान गावातील या विहिरीने ग्रामस्थांना दिलासा दिला आहे.
कोल्हान गावामध्ये स्वातंत्र्यपूर्वकाळातील १९४४ साली दगडी बांधकाम केलेली विहीर आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात अस्पृश्यता, जातीभेद मानला जात होता. जातीनुसार वेगवेगळय़ा विहिरी होत्या. परंतु या विहिरीचे विशेष म्हणजे या विहिरीजवळ एक कोनशिला बसवली असून त्यावर सर्व जाती व धर्माच्या लोकांस ही विहीर उपलब्ध असल्याचे मराठी भाषेमध्ये लिहिलेले आहे. आजही कोल्हान गावातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत ही विहीरच आहे. कोल्हान गावामध्ये सुमारे १२० कुटुंबे राहत असून या गावाची लोकसंख्या साडेपाचशेच्या आसपास आहे. ३० फूट खोल असणाऱ्या या विहिरीला अजूनही दहा ते बारा फूट खोलीवर पाणी असून ते थंड आणि शुद्ध आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात ७८ वर्षांपूर्वी दगड चुनामातीचा वापर करून विहिरीचे बांधकाम केले आहे. आजही ही विहीर सुस्थितीत आहे. विहिरींची साफसफाई करता यावी म्हणून विहिरीला दगडी पायऱ्या बसवल्या असून त्यासुद्धा सुस्थितीत आहेत. सदर विहीर म्हणजे ब्रिटिशकालीन पाणवठय़ाचे एक चांगले उदाहरण आहे. एप्रिल महिना लागल्यानंतर बहुतांश विहिरी कोरडय़ा पडतात. परंतु या विहिरीमध्ये अजूनही दहा ते बारा फुटांवर पाणी आहे. या विहिरीचे जतन करणे आवश्यक असल्याचे गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आमच्या गावात असलेली ही विहीर जवळपास ७८ वर्षे जुनी असून या विहिरीला बारमाही पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध असते. तीस फूट खोल असलेल्या विहिरीला आजच्या भर उन्हाळय़ातही दहाबारा फुटांवर पाणी आहे. गावातील सर्व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी या विहिरीचाच मोठा आधार आहे.
-लक्ष्मण काकरा, ग्रामस्थ, कोल्हान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Still drinking water preindependence wells stone well kolhan village under tawa gram panchayat good condition amy
First published on: 07-04-2022 at 01:17 IST