अन्यथा दुबार पिकांना मुकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन बोंबाडे

डहाणू : डिसेंबर महिना उलटत आला तरी सूर्या उजवा आणि डावा तीर कालव्यांना पाणी सोडण्यात दिरंगाई होत असल्याने डहाणू, पालघर, विक्रमगड येथील दुबार पिकांना मुकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुबार पेरणीची पूर्वतयारी झाली असल्याने पाटबंधारे खात्याने लवकरात लवकर पाटाला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रवी पवार यांनी दोन दिवसांत पाणी सोडू असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

डहाणू, पालघरमधील भेडसावणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन सुमारे २५ ते  ३० वर्षांपूर्वी सूर्या प्रकल्पातील कवडास आणि धामणी धरणांचे पाणी शेतीला पुरवण्यासाठी कालव्यांची तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सूर्या डावा तीर आणि सूर्या उजवा तीर कालवे बांधण्यात आले आहेत. या कालव्यांमुळे  सुमारे १६  हजार हेक्टर शेती ओलिताखाली आणण्याचे लक्ष्य होते. केवळ हजार हेक्टर क्षेत्रही ओलिताखाली आलेले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. धामणी धरणाच्या पाणीसाठय़ासाठी पाटबंधारे खात्याने कवडास येथे कवडास उन्नयी धरण बांधले. त्यातून काही अंतरापर्यंतच पाणी येऊन पोहोचले. मात्र अंतिम टप्प्यापर्यंत अद्याप पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे पाटाला पाणीच येत नसल्याने अनेक भागांत कालव्याचा वापर झालेला नाही.  या धरणाला डावा आणि उजवा २०-२० किलोमीटरचे  तीर कालवे असून, त्यांच्या पिचिंगचे काम अपूर्णावस्थेतच आहेत. गेल्या २७ वर्षांत या कालव्यांचा वापरच न झाल्याने कालव्यांची डागडुजीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कालवे धोकादायक स्थितीत आहेत.

सूर्या तीर कालवे

  • सूर्या उजवा मुख्य तीर कालवा थरोंडा-वाघाडीमार्गे सोनाळे – चरोटी – सारणी – वधना, -रानशेत -साखरा, एनामार्गे शिगाव -बोईसर – कमारे हा मुख्य कालवा सारणीहून  विभागतो.
  • सारणीहून उजवा तीर कालवा- सांरणी-रणशेत वाधना – पिंपळ शेत, रणकोळ, ऐना – साखरामार्गे पाण्याचे वितरण केले जाते.
  • उजवा उपकालवा१   वाघाडी – कासा – भराड
  • उजवा उपकालवा२ –  सारणी – निकावली -आंबिवली -उर्से साये – दाभोन
  • डावा मुख्य तीर कालवा -कावडास, वेती, मुरबाड वांगरजे, तवा, बऱ्हाणपूर, आंबेदे नानिवली, आकेगव्हाण, किराट, रावते असा मार्ग जातो.
  • डावा तीर उपकालवा- वरोती, घोळ, कोल्हण, धामटणे, पेठ

कालवे साफसफाईचे काम पूर्ण झाले असून दोन दिवसांत पाणी सोडण्याचे नियोजन आहे.

–  रवी पवार कार्यकारी, अभियंता सूर्या पाटबंधारे

दुबार भातशेती तसेच लागवडीसाठी शेतकरी पूर्वतयारी करीत आहे. मात्र डिसेंबर उलटत आला तरी पाटाला अद्याप पाणी सोडलेले नाही. उशिरा पाणी सोडल्यास दुबार पेरणी वाया जाण्याची भीती आहे.

–  विनोद भोये, शेतकरी, चारोटी

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya canal farmers waiting ysh
First published on: 22-12-2021 at 01:13 IST