पालघर : आपल्या प्रियकरासोबत केळवे येथे आलेल्या एका विवाहित महिलेचा काल सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात अकस्मात मृत्यू चा गुन्हा दाखल करण्यात आला असून मृताच्या नातेवाईकांनी महिलेच्या कानातून रक्तस्त्राव झाल्या ते दिसून आल्याने या मृत्यू विषयी संशय व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे केळवे येथील न्याहारी निवास योजनेत समाविष्ट रिसॉर्ट हॉटेल येथे सुरू असणारे गैरप्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत.

काही वर्षांपासून मैत्री असणारे एक जोडपे केळवे येथे “दऱ्या निवास” या न्याहारी निवास केंद्रामध्ये वास्तव्य करत असताना सायंकाळी ४.३०- ५.०० वाजल्या दरम्यान विरार (आगाशी) येथील रहिवासी प्रियंका पवार (२७)हिला श्वसनाचा त्रास झाला. स्थानिक पातळीवर उपचार होण्यापूर्वी ती मृत पावल्याचे प्रथम दर्शनी दिसून आल्यानंतर या महिलेला माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजता या महिलेचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.

काल सायंकाळी सफाळे, केळवे, पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने या मृत महिलेला शवविच्छेदनासाठी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यात आले. या महिलेच्या विविध अव्यय (विसेरा) पुढील तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आली असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं नेमके कारण सांगता येईल असे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी लोकसत्ताला सांगितले. शवविच्छेदना चा प्राथमिक अहवाल केळवा पोलिसांकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान मृत महिलेच्या कानामधून रक्तस्राव झाल्याचे निदर्शना झाल्याने या मृत्यू मागे अन्यकारण असल्याचे नातेवाईकाने आरोप केले आहेत. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी रात्री केळवे पोलीस स्टेशनमध्ये येऊन या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

मृत झालेल्या महिलेचा प्रियकर हा बोईसर येथे कामाला असल्याचे सांगण्यात आले असून त्यांनीच आपल्या मृत मैत्रिणीला दवाखान्यात नेल्याची माहिती पुढे आली आहे. प्रियकराचे काही नातेवाईक शासकीय सेवेत वरिष्ठ पदावर कार्यरत असून हे प्रकरण दडपून टाकण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे आरोप होत आहेत.

दरम्यान हा मृत्यू जेवण जेवताना घशामध्ये अन्न अडकून झाल्याचे केळवे हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असून या मृत्यू मागे कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गैरप्रकार पुन्हा चर्चेत

केळवा बीच परिसरात अनेक नामांकित हॉटेल असून त्या ठिकाणी कुटुंब पर्यटनासाठी येत असतात. मात्र काही रिसॉर्ट मध्ये तास निहाय खोल्या उपलब्ध करून देत असल्याने त्या ठिकाणी गैर प्रकार घडत असतात. असे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्वी ग्रामस्थांनी हॉटेल मालकांविरुद्ध आवाज उठवला होता. मात्र काही काळा नंतर हे प्रकरण शांत झाले होते. या महिलेच्या संशयास्पद मृत्यूमुळे केळवे येथील गैरप्रकार पुन्हा चर्चेत आले असून पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही घटना दुर्दैवी असल्याचे मत हॉटेल मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.