बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करी बैठक उधळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत उपायोजना आखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि टिमा या कारखानदारांच्या संघटनेची संयुक्त बैठक बुधवारी टिमा सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला टीमा आणि सीईटिपीचे पदाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सह संचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (जल प्रदूषण) जगन्नाथ साळुंखे, सहाय्यक संचालक (तांत्रिक) राजेंद्र राजपूत प्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस, उप प्रादेशिक अधिकारी राजू वसावे, विरेंद्र सिंग उपस्थित होते.
बैठक सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे, भावेश चूरी, धीरज गावड आणि इतर कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. प्रदूषणाच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीला बाधित ग्रामपंचायतीमधील सरपंच, नागरिक आणि इतर प्रतिनिधींना निमंत्रण नसल्याबद्दल कागदपत्रे भिरकावून तीव्र नाराजी व्यक्त केली.
औद्योगिक क्षेत्रामुळे परिसरातील गावे ही बाधित झाली असून त्यांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत तारापूर मधील प्रदूषणाला टिमा, सीईटीपी हे जबाबदार असून त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आशीर्वाद असल्याचा आरोप करीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत बैठक उधळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
तारापूर येथील प्रदूषणाच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीत येऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत स्वतंत्रपणे बैठक घेऊन त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. – जगन्नाथ साळुंखे, सह संचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (जल प्रदूषण)
तारापूर मधील टीईपीएस ही संस्था बरखास्त करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. – समीर मोरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर