पालघर नगर परिषदेचा अजब प्रकार

पालघर : पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी अस्तित्वात असतानाही त्याच कामाची नव्याने निविदा काढून ती मंजूर केल्याचा प्रताप पालघर नगर परिषदेने केला आहे. देवीसहाय रस्ता येथील जलवाहिनी टाकण्याचे हे काम आहे. नगर परिषदेच्या अशा दुर्लक्षपणामुळे निधीचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप होत आहे.

वजली पाडा येथून पुढे देवीसहाय रस्त्यावर जलवाहिनी रस्त्याच्या मध्यभागी व खालच्या बाजूला असल्यामुळे तिथे नव्याने जलवाहिनी टाकण्याचा घाट घातला जात होता. या दुतर्फा जलवाहिनी टाकण्यासाठी पंधरा लाखांपेक्षा जास्त निधी खर्च होणार होता. मात्र अस्तित्वात असलेल्या जलवाहिनीमुळे ही रक्कमही कमी होणार असल्याचे सांगितले जात होते. या ठिकाणी नवीन काम दाखवून लाखो रुपयांची निविदा मंजूरही केली गेली होती.

आता जलवाहिनी आहे हे लक्षात आल्यानंतर नगर परिषदेने रस्त्याच्या डाव्या बाजूने जलवाहिनी टाकली जाईल, उर्वरित भागात काम केले जाईल, अशी सारवासारव केली आहे.  नगर परिषदेचे पाणीपुरवठा विभाग सभापती व उपनगराध्यक्ष यांना नगर परिषदेमधील पाणीपुरवठय़ाची सर्व वस्तुस्थिती माहीत असताना या कामाच्या मंजुरीचा घाट का घातला, असा प्रश्न नगरसेवक विचारत आहेत. दरम्यान, लोकमान्य पाडा परिसरामध्ये असेच एक काम करण्यात आले होते व कामासाठी जलवाहिनीचे पाइप टाकण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे काम झाले की नाही हे कोणालाच माहीत नाही. मात्र कामासाठी टाकलेले पाइप आजही मैदानात तसेच पडून आहेत.

कामाचा आराखडाच नाही

नगर परिषदेमध्ये जलवाहिनीची अनेक कामे करताना धर ठोक कामे केली गेली आहेत. माहीम रस्त्यावर जलवाहिनी टाकताना निकृष्ट दर्जाच्या काम झाले होते.  कोणत्याही प्रकारचा जलवाहिनी आराखडा नगर परिषदेकडे उपलब्ध नाही. याच बरोबरीने भविष्यात सुरू होणारी नवीन रस्त्याची व गटारांची कामे लक्षात घेत जलवाहिनी टाकण्यासाठी कुठलेही प्रयोजन नाही. आताही देवीसहाय रस्त्यावर सुरू असलेल्या गटाराचे काम रस्त्यापर्यंत आलेले आहे. त्यामुळे नवीन जलवाहिनी कोणत्या बाजूला टाकणार हा प्रश्नच असल्याचे सांगितले जाते. 

कामाच्या ठिकाणी आधीच पाइपलाइन असेल याचा अंदाज नव्हता. हा भाग वगळून पुढील काम केले जाईल. त्यामुळे निधीही कमी लागेल.

इंद्रजित सूर्यराव, नगर अभियंता, नगर परिषद, पालघर

जेवढे आवश्यक काम आहे, तेवढेच काम केले जाणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकातील रक्कम आपोआपच कमी होईल.

स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी, नगर परिषद पालघर

या कामाची मंजुरी घेताना प्रत्यक्ष वास्तुस्थिती प्रशासनाला माहीत असणे आवश्यक होते. पाणीपुरवठा विभागाचे सभापती काय करत आहेत? त्यांना या बाबी लक्षात आल्या नाहीत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भावानंद संखे, विरोधी पक्ष गटनेता, पालघर नगरपरिषद