सागरी प्रदूषणामुळे समुद्र जीवांना धोका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन बोंबाडे

डहाणू; डहाणू किनारपट्टीवर  वाळू उपसामुळे किनारा खचणे,  बोंबिल उत्पादक मच्छीमारांचे कोळशांच्या बोटींमुळे नुकसान होणे आदी समस्यांनी सध्या डहाणू किनारपट्टीवरील गावे ग्रासली आहेत.

डहाणू किनारपट्टी परिसरात मांगेल वाडी, सतीपाडा, डहाणू खाडी नाका, दिवा दांडी  आदी अनेक गावे वसली आहेत. दिवा दांडीचा संरक्षक धूपप्रतिबंधक किनारा खचल्याने मांगेल वाडी, दिवा दांडी, डहाणू खाडी नाका या गावांमध्ये समुद्राचे पाणी शिरते. त्याचा परिणाम किनाऱ्यालगत असणाऱ्या घरे , शेती तसेच वाडय़ांवर होत आहे.  घर आणि शेतात पाणी शिरणे हे आता येथे नित्याचेच झाले आहे. मात्र बंदर विकास खाते याकडे दुर्लक्ष करीत आहे. तात्पुरती डागडुज्जी करण्याऐवजी धूपप्रतिबंधक किनाऱ्याचे पक्के बांधकाम करावे यासाठी सागरी सुरक्षा तटरक्षक दलाने सरकारकडे वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

बोईसर ‘एमआयडीसी’मुळे कारखान्यातून सोडलेले दूषित पाणी तसेच  कोळसा पाण्यात पडून होणाऱ्या प्रदूषणामूळे माशांच्या अनेक जाती नष्ट होत आहेत. मांगेळ आळी, सतीपडा, दिवा दांडी किनाऱ्याला वाळू चोरीच्या समस्येने ग्रासले आहे. किनारपट्टीवरील वाळू चोरी  होत असल्यामुळे किनारे खोल होत चालले आहेत. खचलेल्या किनाऱ्याचा अंदाज न आल्यामुळे  मच्छीमार आणि पर्यटकांच्या जिवाला अनेकदा धोका निर्माण झाला आहे. वाळू चोरीमुळे  किनाऱ्यावरील झाडे उन्मळून पडत आहेत. या सर्व समस्या दूर होण्यासाठी स्थानिक लोक सरकारच्या मदतीकडे डोळे  लावून बसले आहेत.

डहाणूचा संरक्षक धूपप्रतिबंधक किनारा खचल्याने समुद्राच्या लाटा थेट किनाऱ्यावर कोसळतात. परिणामी दरसाल किनारपट्टीच्या गावांना पुराचा सामना करावा लागत आहे. शासनदरबारी मात्र पत्रव्यवहार करूनही मच्छीमारांना उपेक्षा पदरात पडत आहे.

धनेश आकरे, मच्छीमार, डहाणू गाव

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Troubleshoot coastal villages sea ysh
First published on: 09-12-2021 at 01:02 IST