वाडा : वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथील अनुदानित असलेल्या माध्यमिक आश्रमशाळेतील ९ वी व १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट तर परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवार ०८ ऑक्टोबर २०२५ रात्री १२:३० ते १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह शाळेच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत

मोखाडा तालुक्यातील मनोज सीताराम वड (१४ वर्षे इयत्ता ९ वी, रा.दापटी तर देविदास परशुराम नावले (१५ वर्षे – इयत्ता १० वी) रा.बिबळपाडा (दापटी) अशी या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे असुन ते एकाच गाव पाड्यातील रहिवासी आहेत. या विद्यार्थ्यांच्या आत्महत्याचे कारण अस्पष्ट असले तरीही काही दिवसांवर आलेल्या परीक्षेचे मुलांना ताण आहे की, अजून काही आत्महत्येचे कारण आहे, हे निश्चित कळू शकलेले नाही.गेल्या १५ वर्षातील ही तिसरी घटना असून यापूर्वी एका शिक्षक आणि विद्यार्थी यांनी देखील आत्महत्या केल्याची माहिती आहे.दरम्यान, नुकताच या घटनेबाबत वाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला असुन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथील अनुदानित असलेली पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय उन्नती मंडळ, भिवंडी अंतर्गत आंबिस्ते  माध्यमिक आश्रमशाळा व वसतिगृह आहे. या शाळेत पालघर- ठाणे जिल्ह्यातील विविध दुर्गम भागातील जवळपास ५२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  मोखाडा तालुक्यातील हे दोन्ही आदिवासी विद्यार्थी देखील या आश्रमशाळेतच लहानपणापासून (इयत्ता पहिली) शिक्षण घेत होते. त्यांची अभ्यासात प्रगती ठीक होती. अशी माहिती मुख्याध्यापक दत्तात्रेय दाते यांनी दिली.

बुधवारी रात्रीचे ७:३० वाजताचे नियमित जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वसतिगृहात झोपी गेले असताना मनोज वड आणि देविदास नावले या दोघांनीही शाळेच्या पाठीमागे व वसतिगृहाच्या समोरील असलेल्या एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेले असल्याचे रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास उमेश पाटील या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची तत्काळ माहिती शाळेतील मुख्याध्यापक दत्तात्रेय दाते व व्यवस्थापक अधिक्षक राजू सावकारे यांना दिली. त्यानुसार शाळा प्रशासनाने गावातील सरपंच व पोलीस पाटील तसेच वाडा पोलीस आणि मयत विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती देवून कळविले.

 घटनेची माहिती मिळताच सरपंच, पोलीस पाटील व स्थानिक वाडा पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, पोलीस नाईक दिलेश भडांगे व अन्य पोलीस कर्मचारी हे रात्री २:१५ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेहांना पहाटे ५:३० वाजता शवविच्छेदनासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात आणले.

या विद्यार्थ्यांच्या एकाकी मृत्यूबाबत पालकांना मोठा धक्का बसला असून पालकांनी आज सकाळी ११ वाजण्याचा सुमारास आश्रमशाळेत जाऊन घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न देखील सुरू केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कुठलीही सुसाईट नोट मिळून आली नाही. मात्र एका आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत एक मोबाईल मिळून आला असून पोलिसांनी तो तपासा करिता ताब्यात घेतला आहे.

 आश्रमशाळा व्यवस्थापन बेफिकीर??

मनोज सीताराम वड आणि  देविदास परशुराम नावले या दोन्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घडलेल्या घटनेमुळे या आश्रमशाळेतील विद्यार्थी सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. या संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेत भोंगळ व अनागोंदी कारभार सुरू असुन विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष नसल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्याचे कारण कळू शकले नाही.पोलिस तपास करीत आहेत. – राजू सावकारे,  व्यवस्थापक अधिक्षक माध्यमिक आश्रमशाळा, आंबिस्ते खुर्द