बोईसर :वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज पुरवठा ठप्प झाला. दोन दिवसांपासून खंडीत झालेल्या वीजेमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी कार्यरत असून ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीजेचा लपंडाव सुरु आहे.

पालघर जिल्ह्यात सहा आणि सात मे रोजी दोन दिवस झालेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसाने जनजीवन विष्कळीत केले. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ३० ते ४० किमी प्रती वेगाने निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब जमिनीवर आले. तर विद्युत रोहित्रे नादुरुस्त झाल्याने तसेच विद्युत तारांवर झाडे आणि फांद्या तुटून पडल्याने जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला असून दुर्गम भागात ३६ तासानंतर देखील वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे.

महावितरणच्या पालघर विभाग अंतर्गत पालघर, डहाणू, जव्हार, विक्रमगड, बोईसर भागात उच्चदाब वाहिनीचे ५४ तर लघुदाब वाहिनीचे तब्बल ७६ खांब पडले. उच्चदाबाच्या ९.५ किलोमीटर वीजवाहिन्या आणि लघुदाबाच्या ७.६ किलोमीटर वीजवाहिन्या कोसळल्या. एकूण तीन रोहित्र जमिनदोस्त होण्यासह ५ रोहित्र नादुरुस्त झाले व ४ उपकेंद्रामंधील वीज वितरण उपकरणांत बिघाड झाला.

जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अशी एकूण २० पथके रांत्रदिवस प्रयत्न करीत आहेत. महावितरण विभागाच्या डहाणू उपविभागात सर्वाधिक नुकसान झाले असून डहाणू जव्हार ३३ केव्ही वीज वाहिनीत बिघाड झाल्याने आशागड, कासा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या परिसरातील गावे दोन दिवस अंधारात होता. त्या पाठोपाठ पालघर येथे देखील मोठ्या प्रमाणात विद्युत खांब व विद्युत रोहित्रांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर वादळी वाऱ्यामुळे झाडे व झाडांच्या फांद्या पडल्याने झाडे हटवून विद्युत तारा व वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावितरणच्या बोईसर उपविभागाअंतर्गत बोईसर परिसर, पूर्व भागातील गावे आणि तारापूर, वाणगाव भागात जवळपास २४ ते ३० तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. यामुळे घरातील विद्युत उपकरणे आणि पाण्याचे बोरिंग बंद झाल्याने नागरीकांचे अतोनात हाल झाले. बुधवारी रात्रीपासून खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरण विभागाला यश आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता नरेंद्र संगेपू यांनी दिली तर पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ३३ केव्ही वीज वाहिनीचा बंद झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी महावितरणची २० पथके वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी काम करीत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुनील भारंबे यांनी दिली.