या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तलासरीत भाजपच्या मदतीने कम्युनिस्ट पक्षाची सत्ता

पालघर: नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या बुधवारी झालेल्या  निवडणुकीत मोखाडामध्ये  शिवसेना व मोखाडा विकास आघाडी आणि विक्रमगड येथे   विक्रमगड विकास आघाडीचे उमेदवार   बिनविरोध निवडून आले आहेत. तर  तलासरीत  शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने पारंपरिक शत्रुत्व असणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा देऊन त्यांचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडून आणला आहे.

मोखाडा येथील १७ जागांपैकी शिवसेनेकडे आठ जागा असल्याने त्यांना सत्ता स्थापनेसाठी एका सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती. शिवसेनेने मोखाडा विकास आघाडीच्या दोन सदस्याना एकत्र यऊन स्वतंत्र गट बनवला होता. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे अमोल पाटील उपनगराध्यक्षपदी नवसू दिघा यांची बिनविरोध निवड झाली.

विक्रमगड नगरपंचायतमध्ये विक्रमगड विकास आघाडीचे १७ पैकी १६ सदस्य विजयी झाल्याने नगराध्यक्षपदी निलेश पडवळे (पिंका) तर उपनगराध्यक्षपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

तलासरी   नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या होत्या, तर तीन जागांवर शिवसेना व दोन जागांवर तलासरी विकास आघाडीचे (अपक्ष) उमेदवार विजय झाले होते. सत्तेच्या गणितामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने शिवसेना व जिजाऊ संघटना प्रणित तलासरी विकास आघाडीने स्वतंत्र गट स्थापन केला होता. या गटामार्फत भाजपमधून निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या आशीर्वाद रिंजड यांना उमेदवारी देण्यात आली होती.

भाजपने शिवसेना या पक्षांच्या गटाला पाठिंबा देण्याऐवजी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला बिनशर्थ पाठिंबा दिल्याने तलासरीच्या नगराध्यक्षपदी सुरेश भोये तर उपनगराध्यक्षपदी सुभाष दुमाडा हे १२ विरुद्ध पाच असा सात मताधिक्याने विजयी झाले.  यामुळे तलासरीमधील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपली सत्ता राखली आहे.

शिवसेना नेत्यांचे गणित चुकले

जिजाऊ  संघटना पुरस्कृत स्थानीय विकास आघाडी सोबत एकत्र येऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या दृष्टीने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आखणी केली होती. त्यानंतर मोखाडा येथील नगराध्यक्ष पद शिवसेनेला सहजपणे मिळाले असले तरीही तलासरीमध्ये शिवसेना अपक्ष गटाला सत्तेपासून दूर राहावे लागले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikramgad mokhada mayor unopposed power of the communist party akp
First published on: 24-02-2022 at 00:25 IST