दररोज ७८५७ मजुरांना रोजगार
वाडा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अंतर्गत वाडा तालुक्यात विविध यंत्रणेखाली १३९ विविध प्रकारची कामे सुरु असून या कामांवर तालुक्यांतीलच ७८५७ मजूर रोज काम करीत आहेत. कामांची व मजुरांची संख्या पुढील आठवडय़ापासून अधिक वाढविण्याची शक्यता असल्याचे वाडा तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी सांगितले.
वाडा तालुक्यात मोठय़ा संख्येने रोजगार उपलब्ध असुन या रोजगारांना आपल्या गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण, तालुका कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम आदी यंत्रणेच्या माध्यमातून वनीकरण, फळबाग, नवीन रस्ते, जुन्या रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, तलावातील गाळ काढणे आदी विविध कामे सुरु करण्यात आली आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गतवर्षी पूरहानीमध्ये नुकसान झालेल्या शेतीच्या बांधांची दुरुस्ती करून देण्याची मागणी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. विशेषत: गतवर्षी वाडा तालुक्यातील शेल्टे येथील पाझर तलाव फुटून ३० एकर शेतजमीनीय तलावातील दगड, माती वाहून येऊन संपूर्ण शेती गाढली गेली आहे. तसेच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेताचे बांध वाहून गेले आहेत. या बांधाचीही रोजगार हमीच्या माध्यमातून दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे रोजगार कार्ड उपलब्ध असेल अशाच शेतकऱ्यांच्या पूरहानीमध्ये नुकसान झालेल्या शेताच्या बांधांची दुरुस्ती करून मिळेल असा फतवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने काढल्याने अनेक शेतकऱ्यांकडे रोजगार कार्ड नसल्यामुळे हे शेतकरी या शासनाच्या बांधबंदिस्ती योजनेला मुकणार आहेत. शासनाने ही अट काढून टाकावी व पूरग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.